इराण अव्वल स्थानी; कोस्टारिकाचा उडवला ३-0 गोलने धुव्वा

0
16

मडगाव  दि.१३ :(वृत्तसंस्था): इराणने फिफा अंडर १७ विश्वचषकाच्या क गटाच्या सामन्यात आज कोस्टारिकाचा ३-0 गोलने धुव्वा उडवताना विजयी हॅट्ट्रिक साधली. त्याचबरोबर आपल्या गटात अव्वल स्थानही मिळवले.
गिनी आणि जर्मनी यांना याआधीच नमवताना इराण संघाने आधीच प्री क्वॉर्टरमधील आपले स्थान निश्चित केले होते. इराणकडून मोहम्मद गोबेशावी याने २५ व्या मिनिटाला, ताहा शरियाती याने २९ व्या मिनिटाला आणि मोहम्मद सरदारी याने ८९ व्या मिनिटाला शानदार गोल केले. या तिन्ही सामन्यांतील विजयासह इराणने ९ गुणांसह क गटात अव्वल स्थान मिळवले.गटात अव्वल स्थानावर राहणारा इराण गोवा येथेच राहणार असून, १७ आॅक्टोबरला अ गट अथवा एफ गटातील तिसºया स्थानावर राहणाºया सर्वोत्तम संघांपैकी एका संघाविरुद्ध खेळेल.
गटात अव्वल स्थानावर राहण्याच्या वज्रनिर्धाराने इराणचा संघ पाच डिफेंडरच्या साथीने उतरला आणि त्यांनी कोस्टारिकाचे हल्ले परतवून लावले आणि तीन गोल केले.
कोस्टारिकाने पूर्वार्धाच्या चार मिनिटांच्या आतच दोन पेनॉल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी गमावली, तर इराणने मिळालेल्या पहिल्या दोन्ही पेनॉल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. यातील पहिला गोल इराणचा कर्णधार गोबेशावी याने, तर दुसरा गोल शरियाती याने केला. मध्यंतरापर्यंत इराण संघाने २-0 अशी आघाडी घेतली होती. कोस्टारिका संघाला बाद फेरीतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय मिळवणे आवश्यक होते; परंतु त्यांना इराणच्या बचावफळीने संधीच मिळू दिली नाही. उत्तरार्धानंतर सामन्याच्या अखेरच्या क्षणी सरदारी याने आणखी एक गोल करताना इराणचा ३-0 गोलने विजय निश्चित केला.