महसूल मंत्री पाटील यांच्याबरोबरच्या चर्चेनंतर महसूल कर्मचाऱ्यांचा संप स्थगित

0
15
मुंबई, दि.१३ : : राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेने संप स्थगित केल्याचे जाहीर केले.विविध मागण्यांसाठी राज्यातील महसूल कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले होते. याबाबत आज मंत्रालयात महसूल मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेबरोबर बैठक झाली.
महसूल लिपीकाचे पदनाम बदलण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. अव्वल कारकून संवर्गातील वेतनश्रेणीतील त्रुटी व नायब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड पे वाढविण्यासंदर्भात राज्य वेतन सुधारणा समितीकडे संघटनेने मागणी केल्यास त्याला पाठिंबा देण्यात येईल. शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नतीसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्यासंदर्भात सहमती असून यासंबंधीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविणेपुरवठा विभागातील निरीक्षकांची पदे शंभर टक्के बदली व पदोन्नतीने भरण्यास व त्यासंदर्भात सेवा प्रवेश नियमात बदल करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. तसेच नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण 33 टक्के वरून 20 टक्के करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आणि आकृती बंधात सुधारणेसाठी दांगट समितीच्या अहवालाचा विचार करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले असल्याचे महसूल मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
            राज्य शासनाने मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे संघटनेने संप स्थगित केल्याचे पत्र पदाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री श्री.  पाटील यांना यावेळी दिले.
यावेळी महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तवअन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठकसंघटनेचे कार्याध्यक्ष द. मा. देशपांडेसरचिटणीस हेमंत साळवी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.