खेळाच्या माध्यमातून जीवनाचा उत्कर्ष करा- अशोक इंगळे

0
30
????????????????????????????????????
राज्यस्तरीय शालेय वुशू स्पर्धेचे उदघाटन
गोंदिया,दि.२ : खेळात परिश्रम आणि जिद्द ही आवश्यक आहे. परिश्रम व जिद्दीच्या बळावर खेळाडू यश संपादन करु शकतो. खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करुन आपल्या जीवनाचा उत्कर्ष करावा. असे प्रतिपादन गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी केले.
जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व ऑल गोंदिया जिल्हा वुशू संघटनेच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय शालेय वुशू स्पर्धेचे उदघाटक म्हणून श्री.इंगळे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभागाचे क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, नगर परिषदेचे सभापती श्री.गोपलानी, प्रोग्रेसिव्ह स्कूलचे प्राचार्य डॉ.पंकज कटकवार, सेंट झेव्हीयर स्कूलच्या प्राचार्या स्मृती छपरीया, छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते संदीप सेलार, डॉ.श्री.ठाकुर, वुशू संघटनेचे जिल्हा सचिव सुनिल शेंडे, प्रकाश जसानी, डॉ.संदीप मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.इंगळे यावेळी म्हणाले, खेळात शिस्त असली पाहिजे, नाहीतर खेळ व्यर्थ आहे. शिस्तीतून माणूस घडत असतो. राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन गोंदिया येथे केल्याबद्दल क्रीडा विभागाचे अभिनंदन करुन श्री.इंगळे पुढे म्हणाले, गोंदिया नगर परिषदेच्या माध्यमातून खेळाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. वुशूसारख्या खेळाच्या माध्यमातून स्वत:चे संरक्षण करता येईल. विशेषत: मुलींना स्वसंरक्षणासाठी या खेळाचा मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.रेवतकर म्हणाले, राजाश्रयाशिवाय खेळाला महत्व नाही. शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या काळात खेळाला राजाश्रय होता. शासन खेळाच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे. देशामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्रात क्रीडा धोरण राबविण्यास सुरुवात केली. त्यामुळे क्रीडा क्षेत्राच्या विकासाला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यस्तरीय वुशू स्पर्धेमध्ये राज्यातील १७६ मुले व १७६ मुली सहभागी झाले. उदघाटन कार्यक्रमाला खेळाडू, त्यांचे पालक, प्रशिक्षक व क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय खेळाडू इशाराणी पांडे हिने उपस्थित खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी अनिल निमगडे यांनी मानले.