रोमहर्षक सामन्यात आयर्लंडचा झिम्बाब्वेवर विजय

0
11

‘ब’ गटातील झिम्बाब्वे विरुध्द आयर्लंड सामन्यात आयर्लंडने झिम्बाब्वेवर फक्त पाच धावांनी विजय मिळवला आणि उपांत्यपूर्वफेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले.
होबार्ट –शेवटच्या षटकापर्यंत श्वास रोखून धरायला लावणा-या ‘ब’ गटातील झिम्बाब्वे विरुध्द आयर्लंड सामन्यात आयर्लंडने झिम्बाब्वेवर फक्त पाच धावांनी विजय मिळवला आणि उपांत्यपूर्वफेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले.
या पराभवामुळे झिम्बाब्वेचा विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. आयर्लंडच्या ३३२ या डोंगराएवढया लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने विजयासाठी शर्थ केली मात्र त्यांचे प्रयत्न पाच धावांनी तोकडे पडले.
शेवटच्या दोन षटकात झिम्बाब्वेला विजयासाठी २६ धावांची आवश्यकता होती. मपारीवाराने केविन ओब्रायनच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत ४९ व्या षटकात १९ धावा लुटल्या. शेवटच्या षटकात सहा चेंडूत सात धावांची आवश्यकता होती. क्युसॅकच्या हाती चेंडू होता त्याने पहिल्याच चेंडूवर चाकाबावाच्या यष्टया उखडल्या. चाकाबावा (१७) धावांवर बाद झाला.
त्यानंतर तिस-या चेंडूवर क्युसॅकने मपारीवाला (१८) धावांवर पोर्टरफिल्डकरवी झेलबाद केले आणि झिम्बाब्वेचे आव्हान संपुष्टात आले. आयर्लंडच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात डळमळीत झाली होती. ७४ धावात झिम्बाब्वेचे चार फलंदाज तंबूत परतले होते.
ब्रेंडन टेलर आणि सीन विलियम्सच्या शानदार खेळाने झिम्बाब्वेसाठी विजयाच्या आशा निर्माण केल्या. दोघांनी पाचव्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी केली. क्युसॅकने टेलर आणि विलियम्सची जोडी फोडली. टेलरने ९१ चेंडूत १२१ धावांची शानदार शतकी खेळी केली. त्याच्या खेळीत अकरा चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.
सीन विलियम्सने ८३ चेंड़ूत (९६) धावा केल्या. त्याला केविन ओब्रायनने मूनीकरवी झेलबाद केले. या विजयामुळे ‘ब’ गटातील समीकरणे बदलणार असून, उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी चुरस अधिक वाढणार आहे.
विश्वचषकातील झिम्बाब्वे विरुध्दच्या लढतीत आयर्लंडने विजयासाठी ३३२ धावांचे आव्हान ठेवले होते. आर्यंलडने प्रथम फलंदाजी करत आठ बाद ३३१ धावा केल्या.
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आर्यलंडच्या एड जॉयसने केलेली ११२ धावांची तुफानी खेळी आणि त्याला बालर्बिनीची लाभलेली ९७ धावांची सुयोग्य साथ याच्या जोरावर आयर्लंडने तीनशेहून अधिक धावा केल्या. या दोघांनी तिस-या विकेटसाठी १८.३ षटकात १३८ धावांची भागीदारी केली.
चार सामन्यात आतापर्यंत एक विजय मिळवता आलेल्या झिम्बाब्वेला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी आजच्या सामन्यात विजय आवश्यक आहे तर, तीन सामन्यात दोन विजय मिळवणा-या आयर्लंडसाठी आणखी एका विजयाने उपांत्यपूर्व फेरीचा मार्ग अधिक सुकर होईल.
आयर्लंड आणि झिम्बाब्वे हे दोन्ही संघ समान पातळीवरचे तुल्यबळ संघ आहेत. आयर्लंडच्या तुलनेत झिम्बाब्वेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव अधिक आहे. मात्र त्यांना त्या अनुभवाचे विजयामध्ये रुपांतर करता आलेले नाही. याउलट आयर्लंडने सांघिक कामगिरीच्या जोरावर आपण स्पर्धेत लिंबू-टिंबू नसल्याचे दाखवून दिले आहे.
सलामीच्या सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिजचे तीनशेपेक्षा अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पार केले होते. कर्णधार विल्यम पोर्टरफिल्डसह एड जॉयस, अलेक्स कुसॅक, केव्हिन आणि नियाल ओब्रायन, जॉर्ज डॉक्रेल तसेच पॉल स्टर्लिग यांच्यावर आयर्लंडची भिस्त आहे तर, हॅमिल्टन मॅसॅकद्झा, ब्रेंडन टेलर, क्रेग आयर्विन, इल्टन चिगुंबुरा, सिकंदर रझा यांच्यावर झिम्बाब्वेचा संघ अवलंबून आहे.
वेस्ट इंडिजची चिंता वाढली
आयर्लंडने झिम्बाब्वेवर मात केल्याने वेस्ट इंडिजची ‘ब’ गटातून उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची चिंता वाढली आहे. कारण आयर्लंडने विजयासह विंडिजला मागे टाकून चौथे स्थान मिळवले आहे. उपांत्यपूर्व फेरीतून गटातून चार संघांनाच प्रवेश आहे. आता विंडिजची अखेरची लढत यूएईविरुद्ध बाकी आहे. विंडिज त्या लढतीत विजयाचा दावेदार आहे. मात्र आयर्लंडच्या अजून दोन लढती बाकी आहेत. त्या दोन्ही लढती भारत आणि पाकिस्तानविरुद्ध आहेत. या लढती जिंकणे अर्थातच आयर्लंडसाठी सोपे नाही. मात्र २००७ विश्वचषकात आयर्लंडने पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला होता. यंदा देखील त्याची पुनरावृत्ती शक्य आहे. जर उर्वरित दोन लढतींपैकी आयर्लंडने एक लढत जरी जिंकली तरी ते उपांत्यपूर्व फेरीत पोहचतील. यास्थितीत विंडिज गटवार साखळीतूनच बाहेर पडण्याचा धोका वाढला आहे. पाकिस्तान आणि द.आफ्रिका यांची उपांत्यपूर्व फेरी जवळपास निश्चित असल्याने आता ‘ब’ गटात सर्वाधिक दडपण विंडिजवरच आहे.