सीएम चषकाच्या जिल्हास्तरीय स्पर्धा २९ पासून

0
13
गोंदिया,दि.२५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना व कलाकारांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आणण्याचा सीएम चषक हा कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू आहे. याला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यात देखील युक आणि युवतींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. चार विधानसभा मतदारसंघात ३६००० जणांनी यात सहभाग घेतला. याअंतर्गत १२ प्रकारच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक स्पर्धांना राज्य आणि केंद्र शासनाने राबविलेल्या योजनांची नावे देण्यात आली. या स्पर्धांचे बक्षिस वितरण आज(दि.२५) करण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धा २९ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान होणार आहे. यात ६०० स्पर्धक सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज(दि.२५) येथील विश्रामगृहात पत्रपरिषदेत दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, रमेश कुथे, विरेंद्र जायस्वाल, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, सुनिल केलनका, भरत क्षत्रीय, कशिश जायस्वाल आदी उपस्थित होते. बडोले पुढे म्हणाले, आज(ता.२५) माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून अटल मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ५८० स्पर्धकांनी सहभाग घेतला. २९ डिसेंबर पासून गोंदिया येथील इंदिरा गांधी स्टेडिअम येथे जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धतील विजेते राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. विजेत्यांना चषक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देण्यात येणार आहे.