खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भविष्य उज्ज्वल करावे- पालकमंत्री बडोले

0
19

गोंदिया,दि.13 : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा, खेळाविषयी जागृती निर्माण व्हावी तसेच विविध खेळांचा लाभ घेता यावा यासाठी राज्यात तालुका क्रीडा संकुले निर्माण करण्यात आली आहे. या क्रीडा संकुलामध्ये असलेल्या विविध सुविधांचा लाभ घेवून विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत तालुका क्रीडा संकुल सडक/अर्जुनी येथील बहुउद्देशीय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सडक/अर्जुनी नगराध्यक्ष देवचंत तरोणे होते. यावेळी पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, पं.स.सदस्य कविता रंगारी, तहसिलदार राजेंद्र अरमरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री.बडोले पुढे म्हणाले, या तालुका क्रीडा संकुलात विद्यार्थ्यांना विविध खेळ खेळता येतील यासाठी इनडोअर बॅडमिंटन तथा बहुउद्देशीय हॉल, पुरुष डॉरमॅट्री, महिला डॉरमॅट्री, व्यायाम शाळा हॉल, हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, 200 मीटर धावणपथ अशी सोय करण्यात आली आहे. तालुका क्रीडा रस्त्याचे काम तसेच विजेची सुविधा येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे. या क्रीडा संकुलात पोलीस व सैन्य भरती पुर्व प्रशिक्षण सुरु करण्यात येणार आहे. भविष्यात या क्रीडा संकुलात जलतरण तलाव सुध्दा तयार करण्यात येणार असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नगराध्यक्ष श्री.तरोणे म्हणाले, तालुका क्रीडा संकुलामध्ये विविध सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. या सुविधांचा विद्यार्थ्यांनी निश्चितच फायदा घेवून खेळाच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचा तसेच जिल्ह्याचा नावलौकीक करावा असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकातून जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी तालुका क्रीडा संकुलातील प्रस्तावित क्रीडा सुविधांबाबत विस्तृत माहिती देवून ग्रामीण भागातील खेळाडूंना उत्तम प्रकारच्या क्रीडा सुविधांचा लाभ देण्याचा प्रयत्न करुन निर्माण होणाऱ्या क्रीडा सुविधांमध्ये दर्जेदार क्रीडा सुविधा देण्यात येतील असे ते म्हणाले.
कार्यक्रमास नायब तहसिलदार अखिलभारत मेश्राम, नागपूर येथील आर्कीटेक दिनेश नवनागे, कोदामेढी सरपंच अनिता बडोले, मोहगाव सरपंच अलका पातोडे, तिल्ली/मोहगाव सरपंच प्रफुल्ला दिहारी, लक्ष्मण भगत, परमानंद बडोले, तिलकचंद डोंगरवार, मनोज बोपचे, लक्ष्मीकांत धमगाये यांचेसह सडक/अर्जुनी तालुक्यातील खेळाडू, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी केले, उपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी मनोज पंधराम यांनी मानले.