भारताचे फायनलचे तिकीट कापले, 95 धावांनी कांगारु विजयी

0
4

सिडनी – वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 95 धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. ऑस्ट्रेलिायने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 7 विकेट गमावत 328 धावांचा विशाल स्कोअर उभा केला होता. त्याचा पाठलाग करताना भारताने सर्वबाद 233 धावा केल्या. भारतीय फलंदाजांना शेवटपर्यंत सूर गवसला नाही.विश्वचषक स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची शक्यता गुरुवारी फेटाळून लावली. तूर्ततरी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा आपला विचार नसल्याचे धोनीने स्पष्ट केले.
सुरुवातीच्या संयमी फलंदाजीनंतर एकापाठोपाठ गेलेल्या चार विकेटमुळे भारताचा डाव संकटात आला. धोनी आणि राहणेने विकेट टिकवून डाव सावरला. पण अजिंक्य राहणे बाद झाल्याने आणखी एक धक्का भारताला बसला. धावा आणि चेंडू यातील फरक अधिक असल्याने भारतासमोरचे संकट चेंडूगणिक वाढत गेले.
कर्णधार धोनीवर सर्व भारतीय चाहत्यांच्या आशा टिकून होत्या तो 44 व्या ओव्हरमध्ये 65 धावांवर धावबाद झाला. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. त्यानंतर जेम्स फॉकनरने 45 व्या ओव्हरमध्ये सलग दोन जणांना त्रिफळा बाद केले. 45व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर अश्विन आणि पाचव्या चेंडूंवर मोहित शर्माला आल्या पावली परत पाठवले. त्याच्या पुढच्याच ओव्हरमध्ये भारताचा डाव संपुष्टात आला. भारताने 46.5 ओव्हरमध्ये सर्वबाद 233 धावा केल्या. मोहम्मद शमी (1) नाबाद राहिला.
त्याआधी स्टीव्हन स्मिथ आणि अॅरॉन फिंच यांनी केलेल्या भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 329 धावांचे आव्हान ठेवले आहे. बॅटिंग पॉवरप्लेनंतर भारतीय गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केल्याने कांगारुंना काही प्रमाणात रोखण्यात भारताला यश आले आहे. भारताच्या दोन्ही सलामीवीरांना जीवदान मिळाले. रोहित शर्मा डावाच्या तिसऱ्याच चेंडूवर अत्यंत बालबाल बचावला. तर शिखर धवनचा हातातील अगदी एक सोपा झेल हॅडीनने सोडला.
त्यानंतर भारतीय फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. पण 13 व्या षटकात शिखर धवन बाद झाला आणि भारतीय फलंदाजीची घसरण सुरू झाली. एकापाठोपाठ एक विकेट पडत राहिल्या. विराट कोहली एक चुकीचा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. तर मिशेल जॉन्सनने रोहितचा त्रिफळा उडवला. त्यानंतर सुरेश रैनाही लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर निराशेचे वातावरण आहे.