ऑस्ट्रेलिया पुन्हा विश्वविजेते, न्यूझीलंडचे स्वप्न अधुरेच

0
8

मेलबर्न – फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी करत रविवारी मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने आपणच जगज्जेते असल्याचे पुन्हा सिद्ध केले. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सात विकेट राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली.न्यूझीलंडचे १८४ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने ३३.१ षटकांत ३ गडी गमावून गाठले.
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयसीसीचे विद्यमान कार्याध्यक्ष एन श्रीनिवासन यांचा दबदबा जागतिक क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला. कारण आयसीसीच्या अध्यक्षपदी नसतानाही एन श्रीनिवासन यांनी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला चषक प्रदान केला.

आयसीसीचं अध्यक्षपद मुस्तफा कमाल यांच्याकडे आहे. वर्ल्ड कप विजेत्या संघाला आयसीसी अध्यक्षांच्या हस्तेच ट्रॉफी प्रदान करण्याचा नियम आहे. मात्र टीम इंडियाकडून बांगलादेशचा पराभव झाल्यावर कमाल यांनी वादग्रस्त विधानं केली होती. त्यामुळे कमाल यांनी आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केलं असून त्यांना ट्रॉफी प्रदान करता येणार नाही असा दावा श्रीनिवासन यांनी केला होता.
मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर (एमसीजी) वर्ल्डकप फायनलमध्ये न्यूझीलंडलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करत सर्वबाद 184 धावा केल्या. ग्रांट एलियटने सर्वाधिक 83 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी जॉन्सन, फॉकनरने शानदार गोलंदाजी केली. त्यांनी प्रत्येकी 3 विकेट मिळवल्या. त्यानंतर स्टार्कने न्यूझीलंडचे दोन मोहरे टीपले. तर मॅक्सवेलला एक गडी बाद करण्यात यश मिळाले. जॉन्सनने सर्वात कमी (30) धावा दिल्या.
न्यूझीलंडचे भरवशाचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मैदानात आलेल्या ग्रांट एलियटने संघासाठी पाय रोवून खेळी केली. सेमी फायनलमध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध एलियटने शानदार खेळी केली होती. तेव्हाही आघाडीचे तीन फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर एलियटने शेवटपर्यंत टीकून न्यूझीलंडसाठी फायनलचे दार उघडले होते. मेलबर्नच्या मैदानावर एलियटने 52 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. दुसर्‍या बाजूला फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत असताना एलियटने धावफलक हलता ठेवला फॉकनरच्या यॉर्करचा तो शिकार झाला. 82 चेंडूत त्याने 83 धावा झळकावल्या. त्यात 7 चौकार आणि 1 षटकार लगावला.
न्यूझीलंडला पहिला झटका कर्णधार ब्रेंडन मॅक्कुलमच्या रुपाने बसला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने पहिल्या ओव्हरमध्ये मॅक्कुलमला बोल्ड केले. तेव्ह संघाच्या फक्त तीन धावा तर मॅक्कुलम शुन्यावर तंबूत परतला.
भारतीय चाहत्यांना पत्र
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार ब्रेंडन मॅक्कुलमने भारतीय चाहत्यांना पत्र लिहिले आहे. तो म्हणतो, ‘भारतातील सर्व क्रिकेट चाहत्यांनो, विश्वचषकाची भूक तुम्हाला माहीत आहे याची मला जाणीव आहे. आमच्यासाठी तुमच्या पाठिंब्याचा अनुभव मी यापूर्वीही घेतला आहे. धन्यवाद, आम्हाला त्याची पुन्हा गरज आहे. तुम्ही फायनलमध्ये आम्हाला पाठिंबा द्यावा, प्रत्येक चेंडूवर आम्हाला साथ द्यावी, असे माझे नम्र आवाहन आहे. हा आमच्या करिअरमधील सर्वात मोठा सामना आहे. त्यामुळे एक अब्ज लोकांचा आवाज आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.’

संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड- सर्वबाद १८३
ऑस्ट्रेलिया- तीन बाद १८६
सामनावीर – जेम्स फॉकनर (ऑस्ट्रेलिया)