आत्मविश्वासाच्या तळाशी, त्यांनी पिकवले मोती!

0
37

समुद्राच्या खोल खोल तळाशी, एका शिंपल्यात तो तयार होतो. म्हणूनच त्यांची किंमत आणि महत्त्व खूप आहे. मोती आवडत नाही, अशा स्त्रिया विरळाच. शुभ्र मोत्याची माळ, मोत्यांचे दागिने म्हटल्यावर स्त्रिय़ा भावूक होणार नाहीत हे शक्यच नाही.  मोती फक्त समुद्रात मिळतात असाच सार्वत्रिक समज आहे. परंतु, मोती उगवता सुद्धा येऊ शकतात! होय, मोत्यांची शेती पिकवता येते. हे दाखवून दिले आहे यवतमाळच्या दुर्गांनी…
विदर्भ विकास मंडळ, नागपूर व माविम, यवतमाळ यांच्या सहाय्याने मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत ‘मोती संवर्धन प्रकल्प’ ही योजना तेजस्विनी लोक संचालित साधन केंद्राद्वारे, आर्णी येथील दुर्गामाता महिला बचत गट राबवतो आहे. या नवदुर्गांनी राबवलेली ही शेती मातीत करायची नसून, गोड्या पाण्यातील केली जाते आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये यवतमाळच्या दुर्गामाता महिला बचतगटाने मोती संवर्धन प्रकल्प सुरू केला. या बचत गटात 10 महिला लाभार्थी आहेत. योजनेकरिता तेजस्विनी लोक संचालित साधन केंद्राने व दुर्गामाता महिला बचत गटाने प्रत्येकी पाच टक्के निधी भरला. उर्वरित 90 टक्के अनुदान शासनाकडून देण्यात आले आहे. या योजनेतून वार्षिक उत्पन्न घेतले जाणार आहे. दुर्गामाता महिला बचत गटातील प्रत्येक लाभार्थी महिलेला वार्षिक अंदाजे ४५ ते ५० हजार रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे. मोती संवर्धन प्रकल्पामुळे ग्रामीण महिलांना नवीन शेतीपूरक व्यवसायाची संधी मिळाली आहे. या संधीच्या माध्मयातून महिला आता  आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील आणि पर्यायाने लोक संचालित साधन केंद्राच्या उत्पन्नात आर्थिक भर पडेल. जिवंत शिंपले व मृत शिंपले यातील फरक ओळखणे, मोतीची शिंपल्यात लागवड करणे,  शस्त्रक्रिया करणे यासारख्या प्रत्येक गोष्टीची बारकाईने या महिला माहिती घेत असतात. त्यामुळे आत्मविश्वासाने या प्रकल्पातून महिला उत्पन्न घेत आहेत.
मोत्यांचे दागिने घातले जातात किंवा सोन्यांच्या दागिन्यात मढवलेले मोती असतात. मोत्यांचे नैसर्गिक, संवर्धित आणि कृत्रिम असे तीन प्रकार आहेत. दुर्गामाता महिला बचत गट आर्णीमध्ये शेततळ्यात संवर्धित शिंपल्याचे पिक घेत आहेत. यातला संवर्धित मोती हा संवर्धित करावयाच्या शिंपल्यात एक छोटीशी शस्त्रक्रिया करून ‘न्युक्लीअस’ चे (ठराविक शिंपल्याचा एक तुकडा किंवा भुकटी) रोपण करून गोड्या पाण्यात तो शिंपला ठेवला जातो. या शिंपल्यात तयार झालेला मोती संवर्धित मोती होय. हा मोती नैसर्गिक मोत्यासारखा आणि तितकाच गुणवत्तापूर्ण असतो. अशा पद्धतीने तयार झालेल्या गुणवत्तेच्या खऱ्या मोत्यांना प्रचंड मागणी असून त्याची किंमतही मोठीच मिळते. आतापर्यंत मोती संवर्धनाचा व्यवसाय खासगी व्यक्ती, संस्थापुरताच मर्यादित होता. मात्र आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्हा अशी वेदनादायी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील बचत गटाच्या महिलांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांना जगावेगळ्या आणि हमखास उत्पन्नाच्या शेतीची प्रेरणादायी वाट दाखविली आहे. यवतमाळच्या आर्णीतील या नवदुर्गा आता आर्थिक सक्षमतेनं लक्ष्मीही होणार आहेत. माविमच्या सहकार्याबद्दल या महिलांनी महिला बालविकास मंत्री अँड यशोमती ठाकूर, माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्यासह यवतमाळच्या माविमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करीत यापुढेही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहेत.