जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत मनरेगाचे उत्तम काम – अरूण जेटली

0
6

नवी दिल्ली : महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीत मनरेगा अंतर्गत उत्तम कामे झाली, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कौतुक केले.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा)च्या दशकपूर्तीनिमित्त केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञानभवनात आज राष्ट्रीय मनरेगा संमेलनाचे उद्घाटन श्री.जेटली यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह, राज्यमंत्री सुदर्शन भगत, केंद्रीय पेयजल व स्वच्छता राज्यमंत्री द्वय कृपालसिंह यादव आणि निहालचंद यावेळी मंचावर उपस्थित होते.

अरूण जेटली म्हणाले, महाराष्ट्र शासनाने राज्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना उत्तम प्रकारे राबविली. या योजनेअंतर्गत राज्यातील ६,१८० गावांमधे १.२० लाख काम झाले असून यातील बहुतांश कामे ही लोकसहभाग व मनरेगा योजनेअंतर्गत करण्यात आली. केंद्र सरकार मनरेगाचा विस्तार करणार असून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह म्हणाले, देशातील ८ कोटी ग्रामीण जनतेनी मनरेगाचा लाभ घेतला असून यावर्षी ही संख्या वाढून ११ कोटी पर्यंत पोहचविण्याचे उदिष्ट्य आहे. १८ लाख मनरेगा कामगारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
राज्याचे मनरेगा आयुक्त अभय महाजन, लातुरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, रोजगार हमी योजनेचे उपसचिव प्रमोद शिंदे, लातूर आणि अमरावती जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्यातील निवडक पंचायत समितीचे सभापती व संरपंच, कामगार यांच्यासह राज्यातील ६५ प्रतिनिधींनी या संमेलनात सहभाग घेतला.(साभार महान्युज)