रामलालने काष्ठ शिल्पकलेतून केले अनेकांना स्वावलंबी

0
14

यशकथा

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.20-प्रत्येकाकडे काही ना काही उपजतच कला गुण असतात. हे कलागुणच त्यांना जिद्द आणि कठोर मेहनतीच्या बळावर स्वावलंबी करण्यास मदत करतात. आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा इतरांनाही दानधर्म करुन त्यांना स्वावलंबी करणारे फारच थोडे असतात. सालेकसा तालुक्यातील निंबा येथील रामलाल चव्हाण या काष्ठ शिल्पकाराने गावातील अनेकांना या काष्ठशिल्पकलेचं १५ वर्षापूर्वीच प्रशिक्षण देवून त्यांच्यातील कौशल्य विकसीत केली. निंबा गावातील जवळपास ११ विवाहीत युवकांची काष्ठशिल्पकला ही आज त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनली आहे.
सालेकसा तालुका तसा मागास, दुर्गम, जंगलव्याप्त आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो. सालेकसापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेले निंबा हे दोन हजार लोकवस्तीचे गाव. काष्ठशिल्पकलेचा बादशाह असलेला रामलाल निंब्यात राहतो. रामलाल चव्हाण वय ५० वर्ष, शिक्षण बी.कॉम. व एम.कॉम. प्रथम वर्षापर्यंत झालेले.
१९९२ ते १९५५ या काळात रामलाल गोंदिया येथे निरांचल इन्व्हेस्टमेंट इंडिया लिमिटेड या इलाहाबादच्या फायनान्स कंपनीत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. या कालावधीत कपंनीच्या एजन्टच्या माध्यमातून ‍िंमअनेकांनी गोंदिया येथील निरांचलच्या शाखेत आपला पैसा गुंतविला. कंपनीच्या संचालकांनी या शाखेतील गुंतवणूकदारांचा पैसा घेवून पळ काढला. त्यामुळे गुंतवणूकदार शाखा व्यवस्थापक असलेल्या रामलालकडे आपला पैसा परत मिळावा यासाठी तगादा लावू लागले. कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्यामुळे शाखा व्यवस्थापक म्हणून काम करणारा रामलाल बेरोजगार झाला. परंतु गुंतवणूकदार रामलालकडे आपला पैसा परत मिळावा म्हणून पुन्हा तगादा लावू लागले. रामलालचा यामध्ये कोणताही दोष नव्हता. गुंतवणूकदार निंबा येथे घरी येवू लागले त्यामुळे रामलाल बेचैन व त्रस्त झाला होता. या कटकटीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
रामलालने आपला मुक्काम गावाजवळील शेतात ठोकला. शेतालाच लागून जंगल असल्यामुळे आपण आता काहीतरी काम केले पाहिजे हा निश्चय केला. जंगलात भटकंती करुन बांबूचे व झाडांचे विविध प्रकारचे ओबडधोबड आकाराचे निरुपयोगी असलेले खोड, मुळांना शोधून रामलालने त्यापासून टेबल लॅम्प, साप, शो पीस तयार करण्याचे काम सुरु केले. या लाकडी वस्तूंना मोठी मागणी होवू लागली.
जंगलातील निरुपयोगी व टाकावू लाकडां-मुळापासून रामलाल त्याच्या अंगी असलेल्या कलागुणातून मोर, कासव, गरुड, मासा, हरिण, नाईट लॅम्प, गणपती, गौतम बुध्द, पानपुडा तसेच विविध प्रकारचे वॉलपिस तयार करु लागला. हळूहळू हीच काष्ठशिल्पकला रामलालच्या उदरनिर्वाहाची साधन बनली. अनेकांची पाऊले काष्ठशिल्पाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी निंब्याकडे वळली.
रामलाल हा उत्कृष्ट काष्ठ शिल्पकार असल्याची बाब पंचायत समिती सालेकसा येथे माहीत झाल्यानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून विविध ठिकाणी भरलेल्या प्रदर्शनात रामलालने तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध झाली. प्रगती मैदान दिल्ली, मुंबई येथील सरस प्रदर्शन, पुणे, वेरुळ, नागपूर, रायपूर या छत्तीसगडच्या राजधानीत भरलेल्या प्रदर्शनातून रामलालने तयार केलेल्या वस्तुंची विक्री झाली.
रामलालने आपल्या अंगी असलेली काष्ठ शिल्पकला ही स्वत:पुरती मर्यादित न ठेवता गावातील अनेक युवकांना स्वत:च्या घरीच प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण दिले. युवकांचे त्यावेळीच या कलेत कौशल्य विकसीत करुन रामलालने कौशल्य विकासाचा कार्यक्रम गावात राबविला. निंबा येथील सुभाष वरकडे, ताराचंद बावनथडे, रमेश भगत, कुवरलाल ‍बिसेन, मुन्ना बिसेन, अनिल बिसेन, सुखचंद भगत, नरेश भगत, माणिकलाल कटरे, होसलाल कटरे, शालिक भगत यांना रामलालने काष्ठ शिल्पकलेत तरबेज केले. रामलालने दिलेल्या प्रशिक्षणातून कौशल्य विकसीत झालेली ही विवाहीत युवा मंडळी आज गावात विविध प्रकारच्या काष्ठ शिल्पकलेतून वस्तू तयार करुन विक्री करीत आहे. काष्ठ शिल्पकला ही या युवकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनली आहे.
गोंदियाचे पहिले जिल्हाधिकारी संजीवकुमार यांनी सुध्दा रामलालने तयार केलेले काष्ठशिल्प बघितले. मेहनती व जिद्द असलेल्या रामलालला त्यांनी पाठबळ दिले. काबील कास्तची ४ एकर जमीन त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. काष्ठ शिल्पकलेतून तयार करण्यात येणाऱ्या वस्तूंच्या विक्रीतून रामलालला महिन्याकाठी १५ ते २० हजार मिळते. शेतीतून सुध्दा चांगले उत्पन्न होत असल्यामुळे आणखी तीन एकर शेती विकत घेतली आहे. रामलालची मुलगी वैशाली ही बीड येथे बी.टेक. करीत आहे. भुवनेश्वर व नेगेश्वर ही दोन मुले १२ वी विज्ञान शाखेतून चांगल्याप्रकारे उत्तीर्ण झाली आहे. पीएमटीची तयार करीत असून दोघांना डॉक्टर बनविण्याचे रामलालचे स्वप्न आहे.
निंबासारख्या छोट्या गावात अनेकांना काष्ठ शिल्पकलेतून आत्मनिर्भर करणाऱ्या रामलालला त्याची मुले सुध्दा चांगली शिकून मोठ्या पदावर पोहचली पाहिजे यासाठी तो परिश्रम घेत आहे. मेक इन इंडिया तसेच कौशल्य विकास कार्यक्रमातून रामलालला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु करायचा आहे. त्यासाठी त्याला प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेवून अनेक काष्ठ शिल्पकारांची फौज तयार करुन त्यांना स्वावलंबी करण्याचा विचारही रामलालने बोलून दाखविला.