भंडारा जिल्ह्यात जलयुक्त शिवारसाठी ४.९० कोटींचा खर्च

0
18

भंडारा, दि. 20 -पावसाचे पाणी गाव शिवारात अडवून भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे हा मुख्य उद्देश्य नजरेसमोर ठेवून सिंचन क्षमता वाढविण्यावर भर देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे मागील ११ महिन्यात जिल्ह्यात ३४८ कामे पुर्ण झाली असून त्यावर ४ कोटी ८९ लक्ष ७५ हजार रूपये खर्च करण्यात आले आहे.शेतकऱ्यांना या अभियानांतर्गत फायदा मिळवून देण्यासाठी त्या दिशेने जिल्हा कृषी कार्यालयाचे कामे सुरू आहे. सिंचन सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात आहे.
२०१६-२०१७ या वित्तीय वर्षाच्या जानेवारी महिन्यापर्यंत भंडारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ५९ गावांची निवड करण्यात आली आहे. अभियानांतर्गत २३८९ कामे पूर्ण करायची असून यासाठी ६१ कोटी ३० लक्ष रूपये खर्च अपेक्षित आहे. ४१९ कामांपैकी ३४८ कामे पूर्ण झाली असून ७१ कामे प्रगती पथावर आहेत. उर्वरीत कामे ई निविदा प्रक्रियेत असल्याचे समजते. भंडारा जिल्ह्यात भातपिकाचे उत्पादन अधिक घेतले जात असल्याने हंगाम आटोपल्यावरच उपरोक्त अभियानाच्या कामांना गती मिळत असते.
भंडारा तालुक्यातील चोवा, रावणवाडी, खुटसावरी, गुंथारा, सालेहेटी, टेकेपार, कोका, सर्पेवाडा, दुधाळा, राजेदहेगाव. मोहाडी तालुक्यातील महालगाव, डोंगरगाव, हिवरा, चिचोली, आंधळगाव, पालडोंगरी, नवेगाव, धोप, ताळगाव, जांब. तुमसर तालुक्यातील हिंगणा, मिटेवानी, झारली, येदरबुची, राजापूर, लोभी, सौदेपुर, सोनेगाव, देव्हाडी, सुकळी तर पवनी तालुक्यातील तांबेखानी, रेंगेपार, ब्रम्ही, निलज, भुयार, आमगाव, कातुर्ली, धानोरी, शेलारी या गावांचा समावेश आहे. याशिवाय लाखनी तालुक्यातील नऊ, साकोली तालुक्यातील सहा तर लाखांदूर तालुक्यातील झरी, पारडी, तिरखुरी, दिघोरी, पेंढरी (सोनेगाव) या गावांची निवड करण्यात आली आहे.