कसाबनंतर पहिल्यांदा हाती आला जिवंत पाकिस्तानी दहशतवादी!

0
10

वृत्तसंस्था
श्रीनगर, दि. ५ – जम्मू काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला करणा-या पाकिस्तानी दहशतवाद्याला जीवंत पकडण्यात यश आले असून या अटकेमुळे पाकविरोधात भारताच्या हाती एक मोठा पुरावा लागला आहे. कासीम उर्फ उस्मान खान असे या दहशतवाद्याचे नाव असून तो लष्कर ए तोयबाचा सदस्य असल्याचे समजते.
जम्मूतील उधमपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी तिघा दहशतवाद्यांनी बीएसएफच्या तुकडीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले असून एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले होते. हल्ला करणारे अन्य दोघे दहशतवादी घटनास्थळाजवळील गावात लपून सुरक्षा दलांवर गोळीबार करत होते. यातील उस्मान खान या दहशतवाद्याने विक्रमजीत व राकेशसह एकूण पाच जणांना ओलीस म्हणून वापरले. पाकिस्तानात जाण्याचा मार्ग मला सांगा, मी तुम्हाला सोडून देईन असे उस्मानने सांगितले. यादरम्यान मला खायला हवे असल्याचे उस्मान म्हणाला आणि त्याच वेळी संधी साधत विक्रमजीत व राकेशने त्याला निशस्त्र करुन ताब्यात घेतले. याच सुमारास लांबून पोलिस येताना दिसले तरीही मला सोडा, पाकिस्तानात जाऊ द्या अशी तो विनंती करत असल्याचे विक्रमजीतने सांगितले. परंतू, या बहादूर तरुणांनी उस्मानला पोलिसांच्या ताब्यात दिले.
अमरनाथ यात्रेकरू निशाण्यावर…
अमरनाथ यात्रेला जाणारे भाविक दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. बीएसएफच्या बस मागे अमरनाथ यात्रेकरूंचा जत्था येणार होता. दहशतवाद्यांना त्यांच्यावर हल्ला करायचा होता. मात्र, हल्ल्याची माहिती मिळतात अमरनाथ यात्रेकरुंना पोलिसांना भगवती नगरात थांबवण्यात आले होते. जम्मू-श्रीनगर महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद ठेवण्यात आला आहे.

तिन्ही दहशतवादी एका ट्रकमधून काश्मीरमधून आले होते. सगळ्यात आधी दहशतवाद्यांना पाहाणार्‍या व्हीडीसी सदस्यांनी ही माहिती दिली आहे. समरोली भागात ते ट्रकमधून खाली उतरले आणि झुडपांमध्ये लपून बसले होते. बीएसएफची बस येताच त्यांनी अंदाधूंद गोळीबार केला.

ओमर यांचे ‘ट्वीट’
जम्मू-काश्मीरचा माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ‘ट्वीट’ करून बीएसएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती दिली आहे. ओमर यांनी चिंता व्यक्त केली आहे.