प्लाटून कमांडरसह दोघांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

0
9

गडचिरोली,दि.१७ : सुमारे १२ लाखांचे बक्षिस असलेल्या प्लाटून कमांडरसह दोन नक्षल्यांनी नुकतेच पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.यामुळे नक्षलचळवळीला जबर हादरा बसला आहे.

बाबूराव उर्फ पुसू देवू वाचामी, त्याची पत्नी पायकी उर्फ गिरिजा उर्फ सन्नी माडका बारसे आणि सुनीता उर्फ रामको नत्थू आतला अशी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांची नावे आहेत. बाबूराव वाचामी हा प्लाटून दलमचा कमांडर होता. छत्तीसगडमधील बुस्की व कोडे येथील चकमकी आणि कापसी येथील भूसुरुंगस्फोटात सहभागी असलेल्या बाबूराववर १२ लाखांचे बक्षीस होते. बाबूरावची पत्नी पायकी उर्फ गिरिजा बारसे ही सीतापूर दलमची सदस्य होती. कृष्णार, इरुभट्टा येथील चकमकी, ताकालूर येथील सरपंचाचा खून, कोकामेट्टा, किहकाळ येथील हत्या, गुमसूर व गुमरका येथील जाळपोळ व बोडमा येथील मारहाणीच्या प्रकरणात तिचा सहभाग होता. तिच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस होते. सुनीता उर्फ रामको ही चामोर्शी दलमची सदस्य होती. आबापूर, पदाबोरिया, गोडलवाही इत्यादी ठिकाणी झालेल्या चकमकी व कोरकोटी लेखाटोला येथील ट्रॅक्टर जाळपोळीत तिचा सहभाग होता. तिच्यावरही दोन लाखांचे बक्षीस होते, अशी माहिती पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

दरम्यान, पोलिसांचे प्रसिद्धीपत्रक जारी होण्यापूर्वी रामको आतला हिचे वडील नत्थू आतला व नातेवाईकांनी आज पत्रकार परिषद घेऊन दलम सोडून घरी आलेल्या आमच्या मुलीला पोलिस घेऊन गेल्यानंतर आठवडा उलटूनही तिचा ठावठिकाणा नाही. त्यामुळे आमची मुलगी नेमकी आहे कुठे? असा सवाल केला. शिवाय पोलिसांनी रामको व तिच्या चुलत बहिणीला जबर मारहाण करुन शेतावरील साहित्य अस्ताव्यस्त केल्याचा आरोपही केला. याविषयी विचारणा झाल्यानंतर पोलिसांनी लगबगीने प्रसिद्धीपत्रक जारी करुन तीन नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती दिली आहे.