बहुमताच्या जोरावर त्यांनी हे केलेलं आहे, परंतु आम्हाला ते मान्य नाही”- अजित पवार

0
19

नागपूर,दि.29ः राज्य मंत्रिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज(गुरुवार) अंतिम आठडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना, यामध्ये कोणत्या विषयांचा समावेश असणार आहे याबाबत सांगितले.

अजित पवार म्हणाले, “आज अंतिम आठवडा प्रस्ताव त्यांनी घेतला, आम्ही त्यांना सगळ्या विरोधी पक्षाच्यावतीने आग्रह करत होतो की तुम्ही तीन आठवडे अधिवेशन घ्या. त्यांना असं वाटलं की २५ डिसेंबर ख्रिसमस झाल्यानंतर, पुढच्या आठवड्यात म्हणजे या चालू आठवड्यात जास्त कोणी लोकप्रतिनिधी येणार नाहीत. परंतु उपस्थिती व्यवस्थित होती. काल केवळ अपवाद होता, कारण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे मुंबईत आलेले होते, त्यामुळे काल काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीची संख्या थोडी कमी होती. ते आम्हाला म्हणाले होते की आपण तिसरा आठवडा घेऊ परंतु नंतर त्यांनी आजच अंतिम आठवडा प्रस्ताव घेण्याचं ठरवलं. शेवटी बहुमताच्या जोरावर त्यांनी हे केलेलं आहे परंतु आम्हाला ते मान्य नाही. कारण, विदर्भ-मराठवाडा आणि उर्वरीत भाग याची चर्चा झाली असती, तर त्याला न्याय देता आला असता, असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे.”

याचबरोबर, “अंतिम आठवडा प्रस्ताव कोणता आहे, अशाप्रकारे काही माध्यमप्रतिनिधींनी मला विचारलं होतं. परंतु माझी लक्षवेधी होती म्हणून मी ताबडतोब गेलो. अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की, आम्ही मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीने एक मोर्चा मुंबईत काढला होता. की महापुरुषांच्या बद्दल, स्त्रियांच्या बद्दल सातत्याने हे सरकार आल्यापासून वरिष्ठ त्यांच्याशी संबंधित असणारे मान्यवर किंवा राज्यपाल, मंत्री, सत्ताधारी पक्षाचे आमदार किंवा त्यांचे प्रवक्ते हे सतत विविध प्रकारची वक्तव्यं करत आहेत, बेताल वक्तव्य करत आहेत, अपशब्द वापरत आहेत. त्यामुळे जनतेचा स्वाभिमान दुखावला जातोय. अशाप्रकारचे जे प्रकार चाललेले होते, त्याबद्दल अंतिम प्रस्तावात विषय घेतला.” असं अजित पवारांनी सांगितलं.

याशिवाय, “दुसरा एक आपल्या कोकणच्यादृष्टीने महत्त्वाचा म्हणजे, गोवा-मुंबई मार्ग माझ्या माहितीनुसार १३-१४ वर्षापासून काम सुरू आहे. आमचं म्हणणं आहे की समृद्धी महामार्गाला सगळ्यांनीच नंतर मदत केली. तो महामार्ग मर्यादित काळात एवढा मोठा होऊ शकतो आणि कोकणवासीयांना वरदान ठरणारा किंवा एकंदरीत पर्यटनाला चालना देणारा, आमचे कोकणवासीय गावला  सणानिमित्त जातात, तिथे उद्योगही आहेत. या सगळ्यांना त्याचा प्रचंड त्रास होतो. तो जरी राष्ट्रीय महामार्गाशी संबधित असला, जर सरकारने मनावर घेतलं तर सरकार त्यामध्ये भूमिका घेऊ शकतं. म्हणून हा एक विषय घेतला आहे.”

“भ्रष्टाचाराच्या संदर्भातील विषय घेतले आहेत आणि हे सरकार आल्यापासून महिलांवर जे अन्याय, अत्याचार होत आहेत, कायदा-सुव्यवस्थेबाबतचे विषय घेतले आहेत. अशाप्रकारचे विविध विषय एकत्रित करून आम्ही अधिवेशनाच्या निमित्त सर्व विरोधी पक्षाचे सदस्यांनी आमची जी भूमिका होती की सीमाप्रश्नाबाबतचा ठराव आम्ही करून घेतला. काल कर्नाटकच्या मंत्र्यांनी मुंबईबाबत वक्तव्य केलेलं होतं, त्याबाबत आम्ही प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर द्यायचं ते सरकारने दिलं. हे जे काही महत्त्वाचे प्रश्न हे आम्ही उपस्थित करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार आम्ही विषय मांडलेले आहेत.” अशी माहितीही अजित पवारांनी दिली.