नक्षल्यांनी भर बाजारात केली पोलिस शिपायाची हत्या

0
10
गडचिरोली,दि.११: एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथे आज भर बाजारात साध्या वेशभूषेतील नक्षल्यांनी एका पोलिस शिपायाची गोळया घालून हत्या केली. दीपक मुकुंद सडमेक(२८)असे शहीद शिपायाचे नाव आहे.
हेडरी येथे पोलिस मदत केंद्र असून, गावात आज  आठवडी बाजार होता. या बाजारात पोलिस शिपाई दीपक सडमेक तैनात होता. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास पाच-सहा साध्या वेशभूषेतील नक्षलवादी तेथे आले. त्यांनी दीपकवर अगदी जवळून गोळया झाडल्या. यात तो शहीद झाला. गोळीबार केल्यानंतर नक्षलवादी सुरजागड पहाडाच्या दिशेने पळून गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे, नक्षलवाद्यांनी दीपककडे असलेली रायफलही पळविल्याची माहिती आहे.
रात्री उशिरा दीपकचा मृतदेह गडचिरोलीला आणण्यात आला. उद्या १२ मार्चला सकाळी पोलिस मुख्यालयाच्या पटांगणावर शहीद दीपकला मानवंदना देण्यात येणार आहे. दीपक सडमेक हा कुरखेडा तालुक्यातील अंगारा येथील रहिवासी आहे. यंदाच्या उन्हाळयात त्याचे लग्न ठरले होते. काही दिवसांपूर्वीच त्याचा साक्षगंधही उरकण्यात आला होता, अशी माहिती आहे.
हेडरी येथे पोलिस मदत केंद्र निर्माण होऊन अवघे अडीच महिने झाले आहेत. २२ डिसेंबर २०१५ रोजी गृहराज्यमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते या पोलिस मदत केंद्राचे उद्घाटन झाले होते. या भागात नक्षल्यांनी प्रचंड दहशत असतानाही पुरेसे पोलिस बल नसल्याने नक्षल्यांच्या अॅक्शन टीमने हे कृत्य करण्याची हिंमत केल्याची चर्चा होत आहे.