दासगाव येथे पशूवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण

0
14

पशूपालकांनी पशूविमा योजनेचा लाभ घ्यावा

गोंदिया दि.११- पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात दुग्ध उत्पादन व व्यवसायाच्या बाबतीत मोठी तफावत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनी आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेतीपुरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायकडे वळणे गरजेचे आहे. ज्या पशूंवर आपली उपजिवीका चालते त्या पशूंचा सुध्दा पशूपालकांनी पशूविमा काढावा असे आवाहन पालकमंत्री रा.सु. बडोले यांनी केले.
गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे पशूवैद्यकीय दवाखान्याचे इमारतीचे लोकार्पण नुकतेच पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषी व पशूसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, महिला व बालकल्याण समिती सभापती विमल नागपूरे, जि.प.सदस्य रजनी गौतम, प.स. सदस्य रामराज खरे, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ.एस.एम.चव्हाण, दासगावच्या सरपंच कविता मेश्राम, उपसरपंच दिलीप मिश्रा यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्हयात मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे पशूंना लागणारा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो. दुग्ध व्यवसाय सामाजिक स्थिती बदलण्याची क्षमता आहे. पशूसंवर्धन विभागामार्फत ८० टक्के अनुदानावर सुरु करण्यात आलेले पशूविमा योजनेचा लाभ पशूपालक शेतकऱ्यांनी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानावरुन आमदार अग्रवाल म्हणाले, पशूसंवर्धन विभागामार्फत विविध योजना पशूपालकांसाठी सुरु आहे. दुधाळ जनावरे वाटप, तलंग गटाचे वाटप यासह अन्य पशूपालकांसाठीच्या योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ पशूपालकांनी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. एस.एम.चव्हाण यांनी केले. संचालन डॉ. विलास गवखरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. राम मिसळ यांनी मानले. कार्यक्रमाला पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच दासगाव ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.