मृत नक्षलींमध्ये कसनसूर दलम उपकमांडर

0
13

विशेष प्रतिनिधी

गडचिरोली, दि.२१: जिल्ह्यातील  एटापल्ली तालुक्यातील कसनसूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सेवारी गावानजीकच्या जंगलात रविवारला झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झालेल्या नक्षल्यामध्ये महिला नक्षलीचा समावेश असून एक कसनसूर दलमची उपकमांडकर, तर दुसरी कसनसूर एरिया कमिटीची सदस्य असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज सोमवारला पत्रकार परिषद घेऊन हि माहिती दिली. पाटील म्हणाले की रविवारला महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या. त्यात निर्मला उर्फ सविता धुर्वे(२५)रा.नैनगुडा व आरती उर्फ सीताई बिसरु पुडो(३०) रा.रानकट्टा यांचा समावेश आहे. निर्मला धुर्वे ही कसनसूर दलमची उपकमांडर होती. २००२ मध्ये ती दलममध्ये भरती झाली. खून, जाळपोळ, अपहरण, अॅम्बूश अशा विविध प्रकारच्या ४० गुन्ह्यांमध्ये तिचा समावेश होता. तिच्यावर ६ लाखांचे बक्षीस होते.

दुसरी मृत नक्षली आरती उर्फ सीताई बिसरु पुडो(३०) ही नक्षल्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाचा सचिव जोगन्ना याची दुसरी पत्नी होती. २००२ मध्ये ती दलममध्ये भरती झाली. विविध प्रकारचे ८० गुन्हे दाखल असलेल्या आरतीवरही ६ लाखांचे बक्षीस होते. दोघीच्या मृत्यूमुळे नक्षल चळवळीला जबर हादरा बसल्याचे संदीप पाटील म्हणाले.

चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, तेथे एक ३०३ रायफल, १ बारा बोअर रायफल, एक क्लेमोर माईन व स्फोटके, ३०३ रायफलीची ७ काडतुसे, १२ बोअर रायफलीची ९ जीवंत काडतुसे, एक मस्केट, ४ पिट्टू, औषधी, एक कॅमेरा फ्लॅश व अन्य साहित्य आढळून आले,अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रणय अशोक व मंजुनाथ सिंगे उपस्थित होते.