सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी यांचे पुतळे हटवण्याची हिंमत होते कशी?; जयंत पाटील यांचा राज्य सरकारला संतप्त सवाल

0
13
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नाशिक/मुंबई–  महाराष्ट्र सदनातील सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवण्याची हिंमत होते कशी?, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारला केला आहे. तसेच, ज्या अधिकाऱ्यांनी हे निर्बुद्धपणाचे काम केले आहे, त्यांच्यावर तातडीने कारवाई करा, अशी मागणीही छगन भुजबळांनी केली आहे.

कर्तबगार स्त्रियांबद्दल द्वेष दिसला

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यावरून शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र सदनात झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्यक्रमास विरोध नाही. मात्र, या कार्यक्रमात पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा फोटोही दिसू नये, एवढा द्वेष राज्य सरकारच्या मनात या दोन कर्तबगार स्त्रियांबद्दल आहे का?, असा सवाल जयंत पाटील यांनी केला.

शिंदे-फडणवीसांची उपस्थिती दुर्दैवी

तसेच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवले. मात्र, अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रोखलेही नाही. ही सर्वात चिंतेची बाब आहे, अशा शब्दांत जयंत पाटील यांच्यासह छगन भुजबळ यांनी शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला. छगन भुजबळ यांनीही शिंदे व फडणवीसांच्या उपस्थितीत हे सर्व घडले, हे अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची 140वी जयंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनामध्ये साजरी करण्यात आली. मात्र, कार्यक्रमासाठी सदनाच्या दर्शनी भागात ठेवलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्यात आला होता. त्यामुळे हा कार्यक्रम वादात सापडला आहे.

देशातील जनता निषेध करेल

जयंत पाटील म्हणाले, सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशापुढे आदर्श ठेवला आहे. आज देशात महिलाही उच्च शिक्षण घेत आहेत, त्याची सुरूवात सावित्रीबाई फुलेंमुळे झाली. अहिल्यादेवी होळकर यांनीही कर्तबगारपणे राज्यकारभार हाकत देशासमोर आदर्श ठेवला आहे. त्यामुळे अशा कर्तबगार महिलांचे पुतळे बाजुला करणे याचा निषेध केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील जनता करेल.

सरकारची भूमिका आता स्पष्ट झाली

जंयत पाटील म्हणाले, सावरकरांच्या कार्यक्रमास विरोध नाही. मात्र, या दोन कर्तबगार महिलांचे पुतळे हटवून सरकारच्या मनात या दोन घटकांबद्दल काय भूमिका आहे, हे स्पष्ट झाले आहे. सावरकरांच्या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे दिसता कामा नये एवढा द्वेष का ? असा सवालही जयंत पाटील यांनी केला.

सावरकरांच्या कार्यक्रमाला विरोध नाही

छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्र सदनात झालेल्या सावरकर यांच्या जयंती कार्यक्रमाला आमचा विरोध नाही. मात्र या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती, हे अतिशय दुर्दैवी आहे.

हे विशिष्ट हेतूने घडवले का?

छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्र सदनात सावरकरांच्या कार्यक्रमासाठी पुतळे हटविण्याचे काही गरज नव्हती. याच इमारतीत चांगला ऑडिटोरियम आहे, या ठिकाणी कार्यक्रम करणे गरजेचे होते. मग पुतळे हटविण्याची आवश्यकता का वाटली. महाराष्ट्र सरकारने याबाबत चौकशी केली पाहिजे. हे काही विशिष्ट हेतूने करण्यात आले आहे का? का घडलं? कस घडलं ? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून या घटनेची चौकशी करावी. हे पुतळे हटवण्याची हिंमत होतेच कशी? ज्याने कोणी हे केले त्यावर कारवाई झालीच पाहीजे.