विषयतज्ज्ञाच्या वृद्ध आईचा उपोषणमंडपातच मृत्यू

0
10

गडचिरोली,दि..८: सतत आजाराचा सामना करावा लागत असल्याने योग्य ठिकाणी बदली व्हावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसलेल्या सर्वशिक्षा अभियानातील विषयतज्ज्ञाच्या वृद्ध आईचा उपोषणमंडपातच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. वच्छलाबाई धर्माजी गेडाम(७०) असे वृद्ध महिलेचे नाव आहे.

गडचिरोली तालुक्यातील नगरी येथील मूळ रहिवासी असलेले प्रभाकर धर्माजी गेडाम(४०) हे सर्व शिक्षा अभियानांतर्गत सिरोंचा येथे विषयतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. अलिकडेच झालेल्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये प्रभाकर गेडाम यांची बदली कोरची पंचायत समितीत करण्यात आली. मात्र आपण आजारी राहत असल्याने रस्त्यावरचे गाव द्यावे, अशी मागणी गेडाम यांनी प्रशासनाकडे केली. परंतु प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने गेल्या दोन दिवसांपासून ते आपल्या वृद्ध आईसमवेत जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसले होते. आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास अचानक त्यांच्या आईचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.