“नक्षल्याचा गणवेश घालून पोलिसांनी केली बेदम मारहाण”

0
15

विशेष प्रतिनिधी
गडचिरोली,दि.२३: मालेवाडा पोलिस मदत केंद्रातील पोलिस अधिकाऱ्याने नक्षलवाद्याचा गणवेश घालून आपणास आठवडी बाजारातून गावाकडे परत येत असताना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याची तक्रार पीडित आदिवासी इसमाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
धानोरा तालुक्यातील मालेवाडा पोलिस ठाण्यांतर्गत मरमा येथील रहिवासी हरिलाल सुरजू धुर्वे(४०)यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी मरमा या गावी राहणारा गरीब आदिवासी असून, शेती हा माझा मुख्य व्यवसाय आहे. शिवाय घरी एक छोटेसे किराणा दुकान आहे. मला २ मुले व १ मुलगी आहे. आम्ही गावकरी आठवडी बाजारासाठी मालेवाडा येथे जात असतो. २२ मे २०१६ रोजी मी मालेवाडा येथे आठवडी बाजाराला गेलो होतो. बाजार आटोपून परत येत असताना ५ ते ६ वाजताच्या सुमारास मालेवाडा पोलिस मदत केंद्राचे पोलिस अधिकारी श्री.वारे व अन्य दोघांनी मला सरकारी दवाखान्याजवळ अडविले. त्यांनी काहीही कारण नसताना मला लाथा बुक्क्यांनी व काठीने रात्री ९ वाजतापर्यंत मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी माझ्या डोळयावर पट्टी बांधली व मला पोलिस मदत केंद्रात घेऊन गेले. तेथेदेखील मला बेदम मारहाण करण्यात आली. काही वेळाने मी बेहोश झालो. त्यानंतर पोलिसांनी माझ्या अंगावरील कपडे काढून मला नक्षलवाद्याचा गणवेश घालून दिला. एवढेच नाही तर माझ्याजवळ बंदूक देऊन माझे फोटो काढले. त्यानंतर त्यांनी माझ्या दुकानाबद्दल विचारपूस केली. “तू तुझ्या दुकानातील साखर पत्ती नक्षलवाद्यांना देतोस, तुझ्याजवळ ५ बंदुका आहेत, त्या तू कोठे लपवून ठेवल्या आहेस?” असे विचारुन मला पोलिसांनी पुन्हा मारहाण केली, असे हरिलाल धुर्वे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या गावातील काही नागरिक मला सोडविण्यासाठी मालेवाडा पोलिस मदत केंद्रात आले असता केवळ तीनच जणांना आत प्रवेश दिला. बाकीच्या लोकांना पोलिस मदत केंद्राच्या बाहेर ठेवले. तसेच मला लगेच गावकऱ्यांपुढे येऊ दिले नाही. त्यानंतर पोलिस निरीक्षक श्री. वारे यांनी मला धमकी दिली, “तुला आम्ही मारहाण केली, हे कोणालाही सांगायचे नाही. सर्वांना सांगायचे की, दारु पिऊन पडलो होतो. त्यामुळे मला मार लागला व पोलिसांनी मला उचलून पोलिस मदत केंद्रात आणले म्हणून. जर तू कोणालाही आम्ही मारहाण केल्याबद्दल सांगितला तर तुला पुन्हा दोन-चार वेळा पोलिस ठाण्यात यावे लागेल. त्यावेळी आम्ही तुला जंगलात नेऊन मारु.” श्री.वारे यांनी दिलेल्या या धमकीमुळे मी घाबरुन गेलो व या घटनेबद्दल मी कोणालाही काही सांगितले नाही. मला मारहाण करण्याच्या आठ दिवसांपूर्वी पोलिसांनी माझ्या गावचा नागरिक गणेश मन्नू पदा यालाही आठवडी बाजारातून उचलून नेऊन बेदम मारहाण केली होती, असे हरिलाल धुर्वे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी मला नक्षलवाद्याचा गणवेश घालून माझे फोटो काढल्याने भविष्यात ते त्या फोटोचा गैरवापर करुन मला खोट्या गुन्ह्यात अडकवू शकतात, अशी भीतीही हरिलाल धुर्वे यांनी व्यक्त केली आहे. मला बेहोश होईपर्यंत मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी व यापुढे अशा घटना होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, असे हरिलाल धुर्वे यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीची प्रत राज्य मानवाधिकार आयोगाकडेही पाठविण्यात आली आहे.
नि:पक्ष चौकशी करणार: पोलिस अधीक्षक
हरिलाल धुर्वे यांनी केलेल्या तक्रारीबाबत पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आपण या घटनेची चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सत्य कळेल. या प्रकरणात काही वेगळी शक्यताही असू शकते. बरेचदा आपल्यावर कारवाई होईल, या भीतीने काही जण अशाप्रकारच्या तक्रारी करीत असतात. तरीही या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी केली जाईल, असे डॉ.देशमुख यांनी स्पष्ट केले.