‘जलयुक्त शिवार’बरोबर ‘वनयुक्त शिवार’वरही भर द्या- पंकजा मुंडे

0
17

मुंबई : राज्य शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान यशस्वी झाले आहे. यापुढील काळात पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने राज्यातील वनक्षेत्र वाढणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाच्या वन विभागाने येत्या १ जुलै रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्षांचे रोपण करण्याचा निर्धार केला आहे. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपले शिवार ‘जलयुक्त’बरोबरच ‘वनयुक्त’ करण्यावर भर देण्यात यावा, असे ग्रामविकास आणि जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

मंत्री श्रीमती मुंडे यांनी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त, कृषी अधिकारी, जलसंधारण विभागाचे अधिकारी आदींशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जलसंधारण विभागाचे सचिव पुरुषोत्तम भापकर, कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती मुंडे म्हणाल्या, जलयुक्त शिवारची कामे राबविताना खोलीकरण, रुंदीकरणाबरोबरच एरिया ट्रीटमेंटवर अधिक भर देण्यात यावा. प्रभावी जलसंधारणाच्या दृष्टीने माथा ते पायथा काम होणे आवश्यक आहे. याशिवाय जलसंधारणाची कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य होतील याकडेही लक्ष देण्यात यावे. राज्य शासनाने या अभियानासाठी मोठा निधी जिल्ह्यांना वर्ग केला आहे. तो निधी परत जाणार नाही, यादृष्टीने खर्चाचे नियोजन करावे. राज्यातील मृतप्राय झालेल्या अनेक नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा व्यापक कार्यक्रमही राज्य शासनाने हाती घेतला आहे. यासाठी सर्व जिल्ह्यांनी नदी पुनरुज्जीवनाचा प्रकल्प अहवाल राज्य शासनास तातडीने सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

जलयुक्त शिवार अभियानातून राज्यातील तलाव, नद्या, बंधारे आदींमधून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला आहे. याचा अनेक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. जलयुक्त शिवारमधून निर्माण झालेले बंधारे तसेच नद्या, तलावांचे करण्यात आलेले खोलीकरण, रुंदीकरण आदी कामांशेजारी वृक्षारोपणाचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात यावा. आपले शिवार जलयुक्तबरोबरच वनयुक्त करुन संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम सर्व विभागांनी प्रभावीपणे राबवावा, असे आवाहनही त्यांनी केले.