जादूटोण्याच्या संशयातून इसमाची नग्न धिंड

0
15

गोंदिया,दि.01- तालुक्यातील जब्बारटोला येथे जादूटोण्याच्या संशयातून एका इसमाला जबर मारहाण करून त्यांच्या अंगावरील कपडे काढून त्याची गावात नग्न धिंड काढण्यात आल्याची संतापजनक घटना 29 जून च्या रात्री 8 ते 10 वाजेदरम्यान घडली.जादूटोणा विरोधात महाराष्ट्र शासनाने कायद्या केला असला तरी त्याचे खुलेआम उल्लंघन सतत होत आहे.कुठल्याही प्रकारे या कायद्याचा वचक दिसून येत नाही.
एका ५५ वर्षीय इसमाला गावातील सरपंच,उपसपंचासह गावातील पोलिस पाटलांसह १५0 ते २00 च्या जमावाने जादूटोण्याच्या संशयातून जबर मारहाण केली. व त्यानंतर त्यांच्या अंगावरील कपडे काढून त्याची गावात नग्न धिंड काढली. जमावाचा प्रयत्न तर त्याला जीवे मारण्याचाच होता मात्र वेळीच अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्या मुळे पोलिसांनी घटनास्थळी पोहचून त्याला जमावाच्या तावडीतून सोडविल्यामुळे त्याचा जीव वाचला. त्याला रात्री १0 वाजताच्या सुमारास गोंदियातील के.टी.एस. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहे. पुरणलाल बघेले (वय ५५) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
जब्बारटोला गावातील एक तरुण मानसिक मनोरुग्ण झालेला आहे. याला पुरणलाल बघेले यांनी जादूटोणा केल्यामुळे या मुलाची स्थिती बिघडल्याचा आरोप करीत गावातील सरपंच,उपसपंचासह गावातील पोलिस पाटलांसह १५0 ते २00 लोकांच्या जमावाने पुरणलाल याच्या घरावर हल्ला चढवित मारहाण केली. त्या नंतर त्यांच्या अंगावरील कपडे काढून त्याची गावात नग्न धिंड काढली व त्याला गावातील मातामंदिरा समोर नेऊन त्याला पादत्राणांसह, लाकडाच्या काठय़ांनी जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणाची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंदिया जिल्हा बजरंग दलाला दिल्यानंतर येथील कार्यकर्त्यांनी अंधर्शद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रकाश धोटें,अमर वराडेसह पोलिसांना पाचारण केले. त्वरित गावात पोहोचून मारहाण होत असलेल्या पूरणलाल बघेले याला जमावाच्या तावडीतून सोडविले. व त्याला लगेच गोंदियातील के.टी.एस. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहे. गोंदिया ग्रामीण च्या पोलिसांनी रात्री पूरणलाल बघेले यांच्या मुलाच्या तक्रारीवरून जमावातील मनोरुग्ण असलेल्या मुलाच्या कुटुंबातील सदस्यांसह गावातील एकूण १0 जणांना अटक केली.त्यांना ३0 जून ला न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली . आरोपींवर महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणा विरोधी कायद्यांन्वये तसेच जमावबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली आहे.