नवी दिल्ली;- १८ वी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर बुधवारी संसद भवनाकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचं वाटप करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे लोकसभा सचिवालयाकडून देण्यात आलेल्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ या नावानं कार्यालय देण्यात आलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाला हा धक्का मानला जात आहे.
अजित पवार यांना मूळ राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव तर तुतारी हे चिन्ह देण्यात आले होते. पण, तरीही शरद पवार गटाने लोकसभेत 8 जागांवर विजय मिळवला. तर अजित पवार गटाला फक्त एक जागा जिंकता आली होती. त्यामुळे खासदारांच्या संख्येनुसार संसदेतील पक्ष कार्यालय शरद पवार यांच्याकडेच आहे तर अजित पवार यांच्या पक्षाला मात्र कार्यालय मिळाले नाही. लोकसभेत सचिवालयाच्या वतीनं पक्षांच्या संख्याबळानुसार त्यांना कार्यालयाचं वाटप केलं जातं. लोकसभेच्या नियमानुसार 8 पेक्षा जास्त खासदार असलेल्या पक्षाला संसद परिसरामध्ये कार्यालय दिलं जातं.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 खासदार निवडून आला. शिवसेना शिंदे गटाचे 7 खासदार निवडून आले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 8 खासदार निवडून आलेत. अशा परिस्थितीत कार्यालयाच्या यादीमध्ये लोकसभा सचिवालयानं शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ असा केला आहे. वास्तविक पक्ष फूटीनंतर हे नाव अजित पवार यांना मिळालं आहे. तर शरद पवार यांना ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष’ असं नाव मिळालं आहे. लोकसभा सचिवालयाकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचे वाटप करण्यात आले. खासदार संख्येच्या आधारे हे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असा उल्लेख करत कार्यालय देण्यात आले तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला तर कार्यालयही देण्यात आलेले नाही.