राज्यात वर्षभरात साठ हजार वैयक्तिक शौचालये उभारणार – मुख्यमंत्री

0
8

पंढरपूर : राज्यात येत्या वर्षभरात सुमारे 60 हजार वैयक्तिक शौचालये बांधली जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज जाहीर केले. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत पंचायत समिती पंढरपूर येथे आयोजित केलेल्या स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडी समारोप समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.

समारंभास कृषीमंत्री पांडुरंग पुंडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, जिल्हाधिकारी रणजित कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, आमदार रामहरी रुपनवर, आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘स्वच्छतेच्या वाटेवरुन समृध्दीकडे जाण्याचा मंत्र संत गाडगेबाबा यांनी देशाला दिला. त्यांच्या शिकवणीतून साकारण्यात आलेले संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान नव्याने सुरु करण्यात येत आहे. या अभियानामुळे राज्यातील अनेक गावे स्वच्छ आणि समृध्द होतील.’

राज्यात वैयक्तिक शौचालये बांधण्याची मोहीम राज्य शासनाने हाती घेतली आहे. गेल्या वर्षी शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने दुप्पटीपेक्षाही जास्त वैयक्तिक शौचालये उभारली आहेत. पुढील वर्षात साठ हजार वैयक्तिक शौचालये उभारण्याचा राज्य शासनाचा मानस आहे, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. लोणीकर म्हणाले, राज्यात स्वच्छतेची लोकचळवळ सुरु झाल्यामुळे स्वच्छतेत राज्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्यात 6 हजार 300 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्या असून 56 लाख कुटुंबानी शौचालयाची उभारणी केली आहे. संतांनी सुरु केलेल्या स्वच्छतेच्या कामास पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गती दिली असल्यानेच स्वच्छतेची लोकचळवळ बनली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हागणदारी मुक्त गाव आणि स्वच्छता दिंडी पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी लोककलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण करुन स्वच्छतेचा संदेश दिला.