प्रयागराज:-उत्तरप्रदेश प्रयागराजमधील महाकुंभमध्ये आज बुधवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास अमृतस्नानाआधी चेंगराचेंगरी झाल्याची बातमी समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. २८ जानेवारीला महाकुंभमध्ये एक कोटींहून अधिक जण दाखल झाल्याची माहिती होती. आज मौनी अमावस्येनिमित्त महाकुंभमध्ये मोठी गर्दी होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यातच आज ही मोठी दुर्घटना घडली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संगमावर गर्दी होऊ नये यासाठी विविध घाटांवर भाविकांचं डायव्हर्जन करण्यात आलं होतं. मात्र सर्वांना संगमावरच स्नान करायचं असल्यानं भाविक त्या दिशेने जात होते. एकाच ठिकाणी जास्त गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. अनेक महिलांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. या घटनेनंतर जखमींना महाकुंभस्थित केंद्रीय रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. अद्याप जखमींचा आकडा कळू शकलेला नाही. मात्र ही संख्या जास्त असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आज मौनी अमावस्येला अमृतस्नान असल्याने 8-10 कोटी भाविक महाकुंभमध्ये पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार, स्नान करणाऱ्या घाटावर हा अपघात घडला. ही घटना साधारण रात्री १.३० वाजेदरम्यान घडली. इतकी गर्दी झाली होती की, लोक एकमेकांच्या अंगावर होते. महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाल्यानंतर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. यादरम्यान आज आखाड्यांचा अमृतस्नान रद्द करण्यात आला आहे. आखाडा परिषदेने अमृतस्नान रद्द केलं आहे. आता सर्व 13 आखाड्यांचं अमृतस्नान रद्द झालं आहे.