महाड दुर्घटनेत आतापर्यंत १४ मृतदेह सापडले, दुसऱ्या दिवशीची शोधमोहीम थांबली!

0
14

मुंबई-सावित्रीच्या पुरातील दुसऱ्या दिवसाची शोधमोहिम थांबली असून महाड दुर्घटनेतील मृत्यांचा आकडा आता १४ वर पोहचला आहे. महाडच्या सावित्री नदीवर पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेतील मृतदेह आज सकाळपासून सापडायला सुरूवात झाली होती. काल शोधकार्यादरम्यान एनडीआरएफच्या जवानांनी नदीतून दोन मृतदेह बाहेर काढले होते. त्यानंतर आज सकाळी कोकणातील आंजर्ले आणि हरिहरेश्वर या दोन समुद्रकिनाऱ्यांवर दोन वाहून आलेले मृतदेह सापडले होते. सावित्री नदीच्या वेगवान प्रवाहामुळे हे मृतदेह इतक्या लांबवर वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, केंबुर्ली गावाजवळ तिसरा मृतदेह मिळाला होता. केंबुर्ली हे गाव महाडपासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर आहे. हे मृतदेह पूल कोसळल्यामुळे महाडच्या सावित्री नदीत वाहून गेलेल्या लोकांपैकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर सापडलेला मृतदेह एसटी चालकाचा असून अन्य दोन ठिकाणी सापडलेले मृतदेह नदीपात्रात वाहून गेलेल्या तवेरा गाडीतील आहेत. अपघात घडला तिथून तब्बल १३० किलोमीटर अंतरावर आंजर्लेजवळ सापडलेला पहिला मृतदेह हा एसटी चालक एस एस कांबळे यांचा मृतदेह सापडला होता.
महाडनजीकच्या दादली गावाच्या परिसरात नौदलाच्या पथकाकडून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. दादली परिसरात एका २० ते २५ वर्षांच्या तरूणाचा मृतदेह सापडला होता. संपदा वझे आणि शेवंती मिरगळ या तवेरा गाडीने गुहागरहून मुंबईकडे येत होत्या. या गाडीत आठजण होते. हरिहरेश्वर येथे सापडलेला मृतदेह वयस्कर महिलेचा आहे. हरिहरेश्वर घटनास्थळापासून ८० किलोमीटर अंतरावर आहे. दरम्यानच्या काळात शोधपथकांना नदीपात्रात एक लोखंडी वस्तू सापडली होती. ही लोखंडी वस्तू एखादे वाहन असण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र शोधमोहीमेला दिवसभरात कोणतेही वाहन हाती लागले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मृत्यांची नावे पुढील प्रमाणे-

संपदा रंजना संतोष वाजे (केंबुर्ली) , शेवंता सखाराम मिरगळ (हरिहरेश्वर-श्रीवर्धन), पांडूरंग बाबू घाग (केंबुर्ली) आवेद अल्ताफ चौगुले (दादली) श्रीकांत शामराव कांबळे (आंजर्ले- दापोली ),प्रशांत प्रकाश माने (बंडवाडी-तारोडी), स्नेहल सुनिल बैकर (राजेवाडी), प्रभाकर भाऊराव शिर्के (केंबुर्ली महाड) रमेश गंगाराम कदम (वराठी, महाड) मंगेष राजाराम कातकर (आंबते).