63 तासांच्या शोधानंंतर सापडला वाहून गेलेल्या तवेराच्या कॅरिअरचा भाग

0
16

वृत्तसंस्था
मुंबई,दि- मुंबई-गोवामहामार्गावर सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 21 जणांचे मृतदेह सापडले आहेत. अद्याप 36 जण बेपत्ता आहेत. शोधमोहीमेच्या तिसऱ्या दिवशी पावसाचा अडथळा कायम आहे. मात्र, तरीही एनडीआरएफ, नेव्ही आणि कोस्टगार्डच्या जवानांनी शोधमोहिम सुरु ठेवली आहे.

तब्बल 63 तासांच्या शोधमोहिमेनंतर वाहून गेलेल्या तवेरा कारचे अवशेष सापडले आहेत. दुर्घघटना घडली त्या ठिकाणापासून अडीच किलोमीटर अंतरावर कारचे अवशेष सापडल्याचे शोधपथकाने म्हटले आहे. दुर्घटनेत बुडालेल्या दोन्ही एसटी बस व इतर वाहने याच भागात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आंबेट खाडीजवळ सकाळी तीन मृतदेह सापडले. मृतदेहांंची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर दादली पूल, केंबुर्ली आणि वावे गावजवळ प्रत्येकी एक मृतदेह सापडला.आज, शुक्रवारी सकाळी दुर्घटना झाली त्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळेे शोधमोहिमेेला विलंंब झाला. पावसाचा जोर ओसरल्याने नौदलाचे पथक सावित्री नदीत उतरले असून शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे.

वाहून गेल्या एकाही वाहनाचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यात दोन एसटी बसचा समावेश आहे. दरम्यान, सावित्री नदी दुर्घटना घडली त्या ठिकाणापासून 18 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्राला मिळते. नदीच्या पूराचा जोर पाहाता सर्व वाहने व बेपत्ता लोक अरबी समुद्रात सामवल्याची भीतीही वर्तवली जात आहे.