‘जय’ वाघाची चौकशी सीबीआईने करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

0
10

नवी दिल्ली,दि.24- महाराष्ट्राचे अर्थमंत्री व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन ‘जय’ वाघाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवावा अशी विनंती केली. यासंबंधीचे निवेदन ही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे सुर्पूत केले.
काल खासदार नाना पटोले यांनी ‘जय’चा कुठेच थांगपत्ता लागला नसल्याने तो जिवंत नसून मारला गेला असल्याचे विधान केले होते. हे विधान अतिशय गंभीर असल्याने हा तपास सीबीआय मार्फत करण्यात यावा व सीबीआय ने खासदार नाना पटोल यांच्याकडून पुरावे प्राप्त करून घेऊन ‘जय’ वाघाचा तपास करावा यासाठी ही विनंती करण्यात आल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. वनमंत्र्यांनी आपल्या निवेदनात ‘जय’ वाघासंबंधी माहिती देतांना म्हटले आहे की, उमरेउ कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय’ नावाने ओळखला जाणारा वाघ बऱ्याच काळपासून दिसत नसल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा तपास महत्वाचा ठरणार आहे.
जय वाघाचा शोध घेण्यासाठी वन विभागाने कॅमेरा ट्रॅपस लावले आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी एक चमू पाठवण्यात आला आहे. अद्याप जय च्या अस्तित्त्वाबाबत ठोस पुरावा मिळालेला नाही. तथापि, या संदर्भात प्रसिद्धी माध्यमातून उलटसुलट बातम्या प्रकाशित होत आहेत. तसेच भंडारा-गोंदिया मतदार संघाचे खासदार नाना पटोले यांनी ही यासंदर्भत जयचा कुठेच थांगपत्ता लागत नसल्याने तो जिवंत नसून मारला गेल्याचे विधान केले आहे. हे विधान अतिशय गंभीर असल्याने आपण जयचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

जय प्रकरणाची सीआयडीच्या माध्यमातून चौकशी करण्याबाबत उद्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.