नोटबंदीच्या निर्णयाविरोधात ममता बॅनर्जींसोबत शिवसेनाही मोर्चात

0
8

वृत्तसंस्था

नवी दिल्ली, दि. 16-  नोटबंदीच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत यांच्यासह इतरही खासदार सहभागी झाले होते. तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते सहभागी झाले होते. या 1 किलोमीटरच्या मार्चनंतर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतींना नोटबंदीच्या निर्णयाविरोधातली एक याचिकाही सुपूर्द केली.

विशेष म्हणजे या मोर्चात अरविंद केजरीवाल सहभागी झाले नाहीत. अरविंद केजरीवालांनी मोर्चात सहभागी होण्याचं ममता बॅनर्जी यांना आश्वासन दिलं होतं. मोर्चात शिवसेना सहभागी झाल्यामुळेच अरविंद केजरीवाल मोर्चात सहभागी न झाल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या मोर्चात शिवसेना, तृणमूल काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, आम आदमी पार्टीचे खासदार सहभागी झाले होते.

दरम्यान, या मोर्चात शिवसेनेनं लोकसभेच्या 18 खासदारांसह राज्यसभेच्या तीन खासदारांना सहभागी होण्यास सांगितलं होतं. या सर्व प्रकारावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा मुद्दा नाही. लोकांना मोदींच्या निर्णयाचा त्रास होत असल्यानंच आम्ही या मोर्चात सहभागी झालो, असे संजय राऊत म्हणाले आहेत. यावेळी ममता बॅनर्जी यांनीही नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. तुम्हाला भ्रष्टाचार संपवायचा आहे, मग 99 टक्के सामान्यांना का त्रास देत आहात, असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. या मोर्चात राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेली शिवसेना सहभागी झाल्यानं भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.