५ जहाल नक्षल्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

0
16

गडचिरोली, ता.२०: राज्य शासनाच्या सुधारित आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत १४ लाखांचे बक्षीस असलेल्या ५ जहाल नक्षलवाद्यांनी नुकतेच गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.दिनेश उर्फ शांताराम सनकू मडावी (२५)रा. बोधीन ता.धानोरा, मंगेश उर्फ येर्रा मडावी(२४)रा.पालेकसा, ता.अहेरी, सविता उर्फ अस्मिता बाजू तुमरेटी(२१) रा.मोरावाही, ता.एटापल्ली, वसंत उर्फ रैजीराम पाठीराम वड्डे (२३) रा.तिरलागड, ता.पाखांजूर (छत्तीसगड) व रवी उर्फ नंदू रामसू गोटा(२५) रा.कोंदावाही, ता.एटापल्ली अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी उर्फ नंदू रामसू गोटा हा २००८ पासून २०१० पर्यंत नक्षल संघटनेची कामे करीत होता. नंतर तो कसनसूर एलओएस/प्लाटून क्रमांक ३ मध्ये सदस्य म्हणून ऑक्टोबर २०१२ पर्यंत कार्यरत होता. त्यानंतर दलम सोडून तो गावात वास्तव्य करीत होता. ऑक्टोबर २०१६ पर्यंत गावात राहून तो नक्षल्यांची कामे करायचा. मंडोली रिठ जंगल, पेंदूलवाही, कारका, भस्मनटोला इत्यादी ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता. शासनाने त्याच्यावर ४ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.वसंत उर्फ रैजीराम पाठीराम वड्डे हा ऑगस्ट २०१० मध्ये प्लाटून क्रमांक ३ मध्ये भरती झाला होता. तेव्हापासून ऑक्टोबर २०१४ पर्यंत तो कार्यरत होता. या दरम्यान ताडगुडा व झुरी नाला येथे झालेल्या चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता. त्याच्यावर शासनाने ४ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.दिनेश उर्फ शांताराम सनकू मडावी हा जून २००६ मध्ये चातगाव जनमिलिशिया दलममध्ये भरती झाला. त्यानंतर त्याने चातगाव एलओएस व एसझेडसी श्रीकांत याच्या गार्डमध्ये काम केले. पुढे काही काळासाठी दलम सोडून तो पुन्हा फेब्रुवारी २०११ मध्ये चातगाव दलममध्ये भरती झाला. ऑगस्ट २०११ पर्यंत तो कार्यरत होता. यादरम्यान नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या पद्दूर,  झारेवाडा व खोब्रामेंढा येथे लावलेला अॅम्बूश व घडविलेल्या चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता. शासनाने त्याच्यावर २ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.मंगेश उर्फ राजू येर्रा मडावी याने फेब्रुवारी २०१० पासून अहेरी एरियाच्या चेतना नाट्य मंचचा अर्धवेळ सदस्य काम करणे सुरु केले. त्यानंतर जुलै २०१२ अहेरी एलओएसचा तो सदस्य होता. डिसेंबर २०१२ मध्ये त्याची चेतना नाट्य मंचच्या विभागीय समितीत बदली करण्यात आली. तेथे त्याने फेब्रुवारी २०१५ पर्यंत काम केले. या काळात आशा, नैनगुडा, कुंजेमरका, नेलगुंडा इत्यादी ठिकाणी झालेल्या चकमकीत तो सहभागी होता. त्याने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ९ क्रमांकाची बटालियन व जिल्हा पोलिसांपुढे त्याने आत्मसमर्पण केले. शासनाने २ लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.

सविता उर्फ अस्मिता बाजू तुमरेटी ही जानेवारी २०११ कसनसूर दलममध्ये भरती झाली. जून २०१४ पर्यंत कसनसूर दलममध्ये ती कार्यरत होती. गडदापल्ली, हिदूर, पेंदूलवाही इत्यादी ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये तिचा सहभाग होता. तिच्यावरही २ लाखांचे बक्षीस होते.जानेवारी ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत ४४ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नुकतेच आत्मसमर्पण केलेल्या पाच नक्षल्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला जबर हादरा बदला असून, पोलिसांची आतापर्यंतची कामगिरी व संपादन केलेला जनतेचा विश्वास यामुळे नक्षलवादी मोठ्या प्रमाणावर आत्मसमर्पण करीत आहेत, असे पोलिस विभागाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. आत्मसमर्पण केलेल्या ५ नक्षल्यांपासून प्रेरणा घेऊन अन्य नक्षलवादीही नक्कीच आत्मसमर्पण करतील, असा विश्वास पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी व्यक्त केला आहे.