ई पलानीस्वामीच तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

0
11

चेन्नई,वृत्तसंस्था दि. 16 – गेल्या अनेक दिवसांपासून धुमसत असलेल्या तामिळनाडूच्या सत्तासंघर्षात अखेर शशिकला समर्थक पलानीस्वामी यांनी बाजी मारली आहे. ई पलानीस्वामी यांना सी. विद्यासागर राव यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ देऊन सरकार स्थापण्याचं निमंत्रण दिले आहे. तसेच राज्यपालांनी 15 दिवसांत तामिळनाडूच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. ई. पलानीस्वामी यांनी पक्षाच्या समर्थक आमदारांची स्वाक्षरी असलेले एक पत्र राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे सुपूर्द केले आहे. त्यानंतर राजभवनाने ते पत्र प्रसिद्धीस दिले आहे.

ई पलानीस्वामी यांनी एआयएडीएमकेच्या 124 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तर ओ. पनीरसेल्वम यांच्या गोटात फक्त दहाच आमदार आहेत. पलानीस्वामी यांना सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण मिळाल्यामुळे अण्णाद्रमुक पक्षाची धुरा शशिकला यांच्याच हातात राहणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यपाल पलानीस्वामी आणि शशिकलांनी रिसॉर्टमध्ये आमदारांना बंधक बनवल्याच्या प्रकरणाचाही बारकाईनं अभ्यास करत आहेत. त्यानंतर पलानीस्वामी यांच्याकडे समर्थक आमदारांचं बहुमत असल्यानंच त्यांना सरकार स्थापण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे, असं राजभवनातून सांगितले जात आहे. ई पलानीस्वामी यांना आज संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे.