पालकमंत्र्यांच्या हस्ते चित्ररथाचा शुभारंभ

0
56

गोंदिया,दि.१६ : समाजकल्याण व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती संबंधित लाभार्थ्यांना व्हावी यासाठी अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या चित्ररथाचा शुभारंभ नुकताच पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते कटंगीकला येथे सरपंच मेळावा दरम्यान करण्यात आला. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या चित्ररथावर अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलामुलींसाठी निवासी शाळा, मागेल त्याला प्रशिक्षण, मुलामुलींसाठी शासकीय वसतीगृह, त्याचप्रमाणे शासनाने मागील दोन वर्षात घेतलेल्या योजनांची माहिती चित्ररथावर देण्यात आली आहे. सोबतच समाजकल्याणच्या विविध योजनांचे ऑडिओ-व्हिडिओ जिंगल्स असून यातून सुध्दा लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे. हा चित्ररथ जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात फिरत असून अनेक लाभार्थ्यांना तसेच नागरिकांना याआधारे योजनांची माहिती मिळण्यास मदत होत आहे