पांगरमल दारुकांडप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कचे 6 अधिकारी निलंबित

0
16

अहमदनगर दि.२५-: अहमदनगरमधील पांगरमल दारुकांडाप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या 6 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यात एक पोलीस उपायुक्त, दोन उपनिरिक्षक आणि तीन जवानांचा समावेश आहे. आपल्या कामात हलगर्जी दाखवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पांगरमलमध्ये विषारी दारुमुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर कौडगावला दोघांना आपला जीव गमावावा लागला आहे.

अहमदनगरमधील पांगरमल दारुकांड प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयीन कोठडी तर तिघांना पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. जाकीर शेख, हनीफ शेख, जितू गंभीर आणि शेखर जाधवला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलं, तर मोहन दुग्गलचा मुलगा सोनू आणि भरत जोशीला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. सर्वांची पोलीस कोठडी संपल्यानं बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी बनावट दारु साठी कच्चा माल कुठून आणला यासह अजून तपास करायचा असल्यानं त्यांची पोलीस कोठडी मागण्यात आली.

या प्रकरणी शिरपूर तालुक्यातील दादा वाणीनं अल्कोहोल पुरवल्यानं त्याला गुन्ह्यात समावेशासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्याचबरोबर दारुच्या बाटल्या भंगाराच्या दुकानातून घेतल्यानं त्याचीही चौकशी सुरु करण्यात आली आहे. दारु बनवण्यासाठी मिथेनॉलचा वापर झाल्याचं आढळल्यानं त्या संदर्भात कसून चौकशी सुरु आहे, तर मोक्का अंतर्गत कारवाई सुरु करण्यात आली आहे.