सरकार जनतेच्या हितासाठी कटिबद्ध-पटोले

0
11

तिरोडा,दि.२५- केंद्र व राज्यातील सरकार जनतेच्या हितासाठी कटिबद्ध असून सर्वानांच शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे याकरीताच तालुकास्तरावर जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जनता दरबाराच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून मी आपले आमदारासंह सर्व प्रतिनिधी तुमच्या समस्या मार्गी लावण्यासाठी काम करीत आहेत.तेव्हा अधिकारी वर्गाने अधिक प्रशासकीय भाषेचा वापर न करता शासनाच्या योजना जनसामान्याप्रर्यंत पोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे विचार खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.
तसेच शेतकरी असो वा शेतमजूर, प्रत्येकाची समस्या सोडविली जाईल. यापुढे अदानी प्रकल्पाद्वारे शेतकèयांचा अपमान केला जात असेल तर तो आम्ही खपवून घेणार आहे.अदानी समुह प्रशासनाने आपल्या व्यवहारीक भाषेत बदल करावे, असे वक्तव्य खासदार नाना पटोले यांनी केले.२२ फेब्रुवारी रोजी तिरोडा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित जनता दरबार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार विजय रहांगडाले, नगराध्यक्षा सोनाली देशपांडे, उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर,उपसभापती डॉ.किशोर पारधी, माजी जि. प. सदस्य मदन पटले, उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, खंडविकास अधिकारी एच.एस.मानकर, तिरोडा ठाणेदार संदीप कोळी, दवनीवाडा ठाणेदार हेमणे, नायब तहसीलदार मासाळ उपस्थित होते.
या जनता दरबारात सुमारे २२ कार्यालयांपैकी केवळ ४ ते ५ कार्यालयासंबंधीच तक्रारी वेळेअभावी मांडता आल्या. यात प्रामुख्याने अर्जुनी, मांडवी व बिरोली रेती घाटावरील अवैध वाळू उत्खनन तथा वाहतूक, संजय गांधी निराधार योजनेच्या तक्रारी, अनेक ठिकाणी तलाठय़ांनी थांबवून ठेवलेले फेरफार व शासकीय नाल्यांसह इतर रस्त्यांवर केलेले अतिक्रमण, असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. अदानी प्रकल्पाद्वारे शेतकर्‍यांना देण्यात न आलेला जमिनीचा मोबदला त्वरित देण्यात यावा, तसेच या प्रकल्पाच्या अधिकार्‍यांद्वारे खोट्या एनओसी घेऊन शेतकर्‍यांच्या शेतीचे व शासकीय तलाव बोड्यांचे नुकसान करून काही ग्रामपंचायतींची जागा अधिग्रहण करताना कबूल केल्याप्रमाणे जागा उपलब्ध करून न दिल्याने त्याचप्रमाणे या प्रकल्पाच्या राख वाहतूक व डम्पिंग योग्यप्रकारे न करता काही शेतकर्‍यांच्या शेतासमोर ही राख टाकण्यात आल्याने या शेतकर्‍यांची झालेली नुकसानभरपाई त्वरित कृषी विभागामार्फत पंचनामा करून देण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली. तक्रार करण्यास गेलेल्या शेतकरी व नागरिकांना दमदाटी करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडत असून यापुढे अदानी प्रकल्पाच्या अधिकार्‍यांच्या दबावाखाली गुन्हे दाखल करू नये व प्रकल्पाविरोधात तक्रार आल्यास त्वरित तक्रार दाखल करून त्यावर कारवाई करावी, असे निर्देश पोलिसांना देण्यात आले. आमचे शासन पारदश्री प्रशासन चालवणार असून आमच्या सरकारने इंग्रज काळापासून चालत आलेले एक हजार जाचक कायदे बदलले. आदी केवळ बीपीएल धारकांनाच मिळणारा शासकीय लाभ व घरकुल आता बीपीएलशिवाय कुठल्याही जाती किंवा धर्माच्या व्यक्तीला मिळणार आहे. २0२२ पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकास घरकुल देण्याचे नियोजन करण्यात आले असून धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे टप्प्या दोन अंतर्गत चोरखमारा, बोदलकसा या जलाशयात २0१९ पर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी सुजलाम सुफलाम होण्याच्या दृष्टीने योजना आखण्यात आली असून सर्व शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांनी केवळ कायद्यावर बोट न ठेवता शेतकरी व नागरिकांच्या शासकीय योजनांचा लाभ मिळावा, याकरिता काम करावे. चांगले काम करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊ, मात्र, हयगय करणार्‍यांवर कारवाई करू असे पटोलेंनी सांगितले.हा जनता दरबार रात्री ७.३0 वाजतापर्यंत चालल्याने इतर विभागाच्या तक्रारी मांडता आल्या नाही.