सैन्यभरतीचा पेपर फुटला; १८ अटकेत

0
8

ठाणे/ पुणे/ नागपूर/ पणजी दि.२७ : सैन्यभरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची चार ते पाच लाखांमध्ये विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. पुणे, नागपूर आणि गोवा येथे छापा टाकून १८ जणांना अटक करण्यात आली असून, ३५० उमेदवारांना ताब्यात घेतल्याची माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
यातून सुमारे १७ कोटी ५० लाखांचा घोटाळा उघड होण्याची तसेच रॅकेटमध्ये सैन्य दलातील बडे अधिकारी सहभागी असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. सैन्य दलातील तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन आणि लिपिकासह चार वेगवेगळ्या पदांसाठी रविवारी देशभरात विविध केंद्रांवर लेखी परीक्षा होणार होती. या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळवून देण्यासाठी तसेच ज्या जिल्ह्यात परीक्षा होणार आहे, तेथील निवासी प्रमाणपत्र मिळवून देणारे दलाल ठाण्यातील काही परीक्षार्थ्यांना भेटले होते. त्यासाठी एका उमेदवाराकडून त्यांनी ४ ते ५ लाख रुपये घेतल्याची खबर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१च्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, उपआयुक्त पराग मणेरे, सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी चार पथके नेमली. या पथकांनी शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवारी पहाटे ४ या कालावधित पुण्याच्या फुरसुंगी, नागपूरच्या निर्मलनगर आणि गोव्यातील वाघाटोर बीच अशा तीन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान प्रश्नपत्रिका फोडून तिची विक्री करणाऱ्या १८ जणांना अटक करण्यात आली असून ३५० उमेदवारांना ताब्यात घेण्यात आले आहे. १८ आरोपींमध्ये सैन्यातील एका निवृत्त अधिकाऱ्यासह निमलष्करी दलातील एका निवृत्त अधिकाऱ्याचाही समावेश आहे. ही माहिती सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही देण्यात आली असून कळवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने नागपूर येथील छाप्यात १० मोबाइल आणि दोन वाहने जप्त केली आहेत. पुण्यातील छाप्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांच्या पथकाने ११ मोबाइल आणि काही प्रश्नपत्रिका हस्तगत केल्या आहेत, तर गोवा येथील छाप्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या पथकाने तीन मोबाइल, ५७ हजारांची रोकड आणि दोन प्रश्नपत्रिका हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.