कोल्हापूर : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या ब्राम्हण्यवाद्यांनी केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींच्या दहशतवादी कारवायांचे पुरावे असणारा लॅपटॉप करकरेंना मिळाले होते. या लॅपटॉमध्ये रेकॉर्ड केलेल्या संभाषणाच्या व्हिडीओ आणि आॅडिओ क्लिप्सचा उलगडा करकरे करत होते. हा उलगडा समोर आल्यास देशप्रेमाच्या नावाखाली सुरू असलेले दहशतवादी कारवायांचे पितळ उघडे पडेल, या भीतीपोटीच ब्राम्हण्यवादी संघटनांनी हेमंत करकरेंचा खून केला, असे प्रतिपादन माजी पोलिस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी केले.
श्रमिक प्रतिष्ठान, समता संघर्ष समिती आणि आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्या वतीने शाहू स्मारक येथे मंगळवारी आयोजित ‘हू किल्ड करकरे’ या व्याखानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा , कर्नल पुरोहितसह अन्य आरोंपीच्या संभाषणाची व्हिडीओ आणि आॅडिओवर करकरेंचा तपास सुरू होता. कट्टर ब्राम्हणवाद्यांचा समावेश असलेल्या अभिनव संघटनेशी हे आरोपी संबंधित होते. या घटनेतील पुरावे समोर आल्यास ब्राम्हण्यवाद्यांचा चेहरा देशद्रोही म्हणून समोर येईल, या भीतीने करकरेंना संपवण्याचा डाव आखण्यात आला होता, असा आरोप त्यांनी केला़
देशाच्या सुरक्षा क्षेत्रातील महत्त्वाच्या अशा आयबीमधील उच्चपदस्थ ब्राम्हण्यवाद्याचाही सहभाग आहे. कारण अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने भारताच्या रॉ या संघटनेला लष्कर -ए-तोयबाचे अतिरेकी मुंबईत येत असल्याची पूर्वसूचना दिली होती. त्यानुसार रॉ ने आयबीला ही माहिती दिली होती. पण आयबीने ही माहिती मुंबई पोलिसांना तसेच वेस्टर्न नेव्हल कमांडला दिली नाही. आयबीने ही माहिती मुंबई पोलिसांना दिली असती, तर २६ / ११ चा हल्ला टळला असता. पण जाणूनबुजून आयबीने ही माहिती दिली नाही, असा आरोपही मुश्रीफ यांनी केला.
मुंबई हल्ल्यांनतर दाखल केलेल्या आरोपपत्रात पोलिस नियंत्रण कक्षाकडे केलेल्या फोनचे टॅपिंग, करकरेंचा मोबाईल, सीएसटीच्या मेन लाईनचे सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे, कामा हॉस्पिटलमधील गोळीबार, या प्रकरणातील अंर्तगत रिपोर्ट आदी बाबींचा विचार आरोपपत्र दाखल करताना करण्यात आलेला नाही. हे प्रकरण दाबण्यासाठी उच्चस्तरीय यंत्रणेने हस्तक्षेप केला आहे, या सर्व बाबींचा उल्लेख मी ‘हू किल्ड करकरे ’या पुस्तकात केला आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.
या पुस्तकात मी २६ / ११ च्या हल्ल्याबाबत करण्यात आलेल्या तपासावर जे सप्रमाण प्रश्न उपस्थित केले आहे. त्या प्रश्नांना खोडून काढण्यासाठी कुणीही पुढे यावे, असे खुले आव्हानही मुश्रीफ यांनी यावेळी दिले. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांचेही यावेळी भाषण झाले़