स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जनतेचे जीवनमान सुधारण्याला प्राधान्य- मुख्यमंत्री फडणवीस

0
12

नागपूर दि.८– : पारदर्शकता आणि कार्यक्षमता हे स्मार्ट सिटीसाठी महत्वाचे असून शहरातील सामान्य नागरिकांना सहज आणि सुलभपणे सेवा पुरविण्यासाठी ई-गव्हर्नरसोबत डिजीटलाईजेशन प्लॅटफार्मचा वापर केल्यास स्मार्ट सिटीच्या संकल्पनेला जनतेचे सहकार्य मिळेल. स्मार्ट सिटी योजना ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी संधी समजून शहराच्या सर्वंकक्ष विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी व्हायला हवी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर महानगरपालिका तसेच इलेटस टेक्नो इंडिया यांच्या सहकार्याने स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी या दोन दिवसीय शिखर परिषदेचा समारोप मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सर्वश्री आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, महापौर श्रीमती नंदा जिचकार, संदीप जोशी, विभागीय आयुक्त अनूप कुमार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्, इलेटसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी गुप्ता आदी उपस्थित होते.
शहरीकरणाला एक आव्हा म्हणून न बघता एक संधी म्हणून बघा, या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या सूचनांप्रमाणे स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी व्हायला हवी, अशी सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले की, स्मार्ट सिटीचा मुख्य उद्देश हा सुलभता व किफायतशीरपणा सुनिश्चित करणे हा असला पाहिजे. त्यादृष्टीने शहरातील प्रत्येक नागरिकांना सेवा व सुविधा पुरविणारा कार्यक्रम हा पारदर्शकता व सक्षमतेच्या दृष्टीने वाटचाल करणारा असला पाहिजे.
तामिळनाडू, केरळ व महाराष्ट्रात सरासरी 50 टक्के शहरीकरण झाले आहे. शहरीकरणामुळे निर्माण झालेल्या प्रश्नासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी नियोजनबद्ध व कालबद्ध कार्यक्रमांचे नियोजन करताना जनतेचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. त्यादृष्टीने नागरिकांना प्रशिक्षित करण्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञान तसेच विविध डिजीटल प्लॅटफार्मचा वापर करुन शहरातील दळणवळण, आरोग्य, पाणीपुरवठा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने मुलभूत सुधारणा होवू शकतात व नागरिकांनाही सर्व सुविधा एकाच व्यासपीठावरुन दिल्यास स्मार्ट सिटीची संकल्पना साकार होवू शकते.
स्मार्ट सिटी शिखर परिषदेसारखे उपक्रम स्मार्ट सिटीचे पर्याय सूचविणाऱ्या कंपन्या, अधिकारी, शासकीय संस्था यांना एकत्र आणणारे एक व्यासपीठ आहे. यामुळे त्यांचा अनुभव व कल्पना यांची देवाणघेवाण होते. नागपूर शहरात घनकचरा व्यवस्थापन व त्यामधून महानगरपालिकेला मिळणारे उत्पन्न हा देशातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम ठरला असून स्मार्ट सिटीच्या अंतर्गत प्रभावी उपाययोजनामुळे पाणी वाटप यंत्रणामध्ये सुधारणा झाली आहे. अशाप्रकारे लोककेंद्रीत व्यवस्था ही स्मार्ट सिटीच्या अग्रस्थानी असली तर प्रत्येक नागरिकांपर्यंत तिचा लाभ पोहोचेल व त्यांचे जीवनमान सुधारेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.यावेळी नागपूर-फर्स्ट सुपर स्मार्ट सिटी तसेच ई-गर्व्हनन्स या नागपूर सिटी या विषयावरील विशेषकांचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांनी केले.
स्मार्ट सिटीसंदर्भात संकल्पना मांडताना श्री.गडकरी म्हणाले की, नागपूर शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. शहराच्या विकासामागे राजकीय हस्तक्षेप न करता नियोजन व व्हिजन समोर ठेवून सकारात्मकतेने विकास प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य दिल्यामुळे नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे. प्रदुषणमुक्त स्वच्छ शहर हे स्मार्ट सिटीला अभिप्रेत असून कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करणे ही संकल्पना प्रत्यक्ष राबविण्यात आली आहे.श्रीमती जिचकार यांनी स्वागत करुन स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी शिखर परिषदेच्या दोन दिवशीय उपक्रमाची माहिती दिली.
श्री. हर्डीकर यांनी स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी शिखर परिषदेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधी उपस्थिती असून स्मार्ट सिटीच्या संदर्भात रोडमॅप तयार करण्यासाठी ही परिषद यशस्वी झाली असल्याचे सांगितले. यावेळी फिलीप्स लाईटींगचे हर्ष चितळे, विश्वराजचे अरुण लखानी, उबेर इंडियाच्या श्वेता राजपाल कोहली यांनी सादरीकरण केले. आभार इलेटसचे सीईओ रवी गुप्ता यांनी मानले. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनोवणे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.