राज्यात ब्रम्हपुरीचे तापमान सर्वाधिक

0
13

ब्रम्हपुरी,दि.17 : सूर्यनारायण इतका निर्दयी कसा असू शकतो, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडायला लागला. सूर्यदेव जराही उसंत घेत नसून एप्रिल महिन्याच्या मध्यातच तापमानाचा पारा ४५ अंश डिग्री सेल्सियस पार झाला आहे. पुढील तीन दिवस उन्हाचा तडाखा आणखी जबरदस्त बसण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.रविवारला ब्रम्हपुरीचे तापमान हे राज्यात सर्वाधिक 45.9 एवढे नोंदविले गेले.तर गोंदियाचे तापमान 44.8 नोंदवले गेले.
कधी नव्हे तेवढे तापमान २0१६ च्या एप्रिलमध्ये तडकले होते. ४0 अंश डिग्री सेल्सियसपासून सुरू झालेल्या एप्रिलमध्ये ३0 तारखेला ४५ अंश डिग्री सेल्सियस इतके तापमान नोंदविले गेले होते. एप्रिलमधील हे तापमान गेल्या शंभर वर्षात सर्वाधिक नोंदविण्यात आले होते. यावर्षी तर तापमानाचा पारा ४0 अंश डिग्री सेल्सियसच्या पार मार्चमध्येच झाला होता आणि १६ एप्रिल रोजी तापमान ४५ अंश डिग्री सेल्सियस पार झाले आहे. त्यामुळे, या वर्षी तापमान ५0 अंश डिग्री सेल्सियस गाठणार का? असा प्रश्न सामान्य नागरिक स्वत:लाच विचारायला लागला आहे. रविवारी विदर्भात नागपूर, अकोला आणि वर्धा या तीन जिल्ह्याचे तापमान ४५ अंश डिग्री सेल्सियस इतके नोंदविले गेले. तर, ४६ अंश डिग्री सेल्सियसला चंद्रपूर व ब्रम्हपुरीने स्पर्श केला आहे. रविवारी चंद्रपूरचे तापमान ४५.८ आणि ब्रम्हपुरीचे तापमान ४५.९ डिग्री सेल्सियस इतके नोंदविले गेले आहे. १७, १८ व १९ एप्रिल रोजी तापमानात प्रचंड वाढ होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.