यशवंत पंचायत राज पुरस्काराने गोरेगाव पंचायत समिती सन्मानित

0
25
गोरेगाव,दि.17: येथील पंचायत समितीने यशवंत पंचायत राज अभियान २0१६-१७ अंतर्गत नागपूर विभागातून प्रथम क्रमांक पटकाविला असून मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे १३ एप्रिल रोजी आयोजित सोहळ्यात पंचायत समितीचे सभापती दिलीप चौधरी व गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांना प्रशस्तिपत्र व पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.

यावेळी सीईओ चंद्रकांत पुलकुंडवार, पं.स. सभापती दिलीप चौधरी,पंचायत समिती सदस्य चर्जे,विस्तार अधिकारी खोटेले यांच्यासह पदाधिकार्‍यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत २0१६-१७ मध्ये जिल्हा परिषद व आठही पंचायत समित्यांनी सहभाग घेतला होता. मात्र गोरेगाव पंचायत समिती वगळता जिल्ह्याला भोपळाच मिळाला. विशेष म्हणजे स्मार्ट व्हिलेज योजना नव्याने सुरू झाल्याने या योजनेत गावांचा सहभाग नव्हता. विशेष म्हणजे या अभियानांतर्गत जिल्हा परिषदेसह अनेक ग्राम पंचायती पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या. गोरेगाव पंचायत समितीने उल्लेखनीय कार्य करून या अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य केले. व त्यामुळे हा सन्मान प्राप्त झाला. गोरेगाव पंचायत समिती नागपूर विभागातून प्रथम आल्याने या पंचायत समितीचे अधिकारी व पदाधिकार्‍यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.