बाबरीप्रकरणी अडवानी, जोशी, उमा भारतींवर खटला चालणार

0
9

नवी दिल्ली ,दि.19- बाबरी मशिदप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह अन्य काही नेत्यांवर कट रचल्याचा खटला चालविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश पी सी घोष आणि आर एन नरिमन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह अन्य काही नेत्यांविरुद्ध गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी खटला चालविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या प्रकरणात नाव असलेले राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह हे घटनात्मक पदावर असल्याने त्यांच्याविरुद्ध खटला चालविता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाची लखनौ न्यायालयात दररोज सुनावणी घेण्याचे निर्देश देत प्रकरण सुरू असेपर्यंत संबंधित न्यायाधीशांची बदली करता येणार नसल्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. या खटल्याच्या सुनावणीबाबत विलंब होणार नाही याची काळजी केंद्रीय अन्वेषण विभागाने घेण्याची सूचनाही न्यायालयाने केली आहे.