गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात 1 जवान शहीद,19 जखमी

0
17
गडचिरोली(berartimes.com), दि. 4 – नक्षलवादी हल्ल्यात सी-60 कमांडोचा एक जवान शहीद झाला आहे. नक्षलवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवून आणत सी-60 कमांडोंची बुलेटप्रूफ गाडी बुधवारला सायकांळच्या सुमारास भामरागड तालुक्यातील हेमलकसा गावापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर कोठी गावाजवळ उडवून दिली. सी-६० कमांडोची एक टीम परिसरातून जात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. यानंतर जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. या चकमकीत सी-६० कमांडोचा एक जवान शहीद झाला आहे. सुरेश लिंगा तेलामी(२७) असे शहीद जवानाचे नाव असून, तो भामरागड तालुक्यातील कृष्णार गावचा रहिवासी आहे.
जखमींमध्ये पोलिस उपनिरीक्षक दीपक मांडवलकर, तसेच प्रकाश कन्नाके, टिल्लू करंगामी, प्रीतम बारसागडे, जितेंद्र कोरेटी, सावन मट्टामी, गजानन पानेम, मनोहर पेंदाम, चिन्ना करंगामी, आयतू पोद्दाडी, सचिन आडे, रैनू तिम्मा, बिरजू धुर्वा, अतुल येग्लोपवार, केशव परसे, नामदेव बोगामी, विद्युत दहादुल्ला, सतीश महाका, भास्कर बनकर आदींचा समावेश आहे. सी-६० पथकाचे कमांडर विसू गोटा व मनोहर महाका हेही जखमी असल्याची माहिती आहे. हे सर्वजण अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातील सी-६० पथकाचे जवान होते.
सी-60 कमांडोंचं पथक गस्तीवर असतानाच नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या मदतीने त्यांची बुलेटप्रूफ गाडी उडवली. या स्फोटात 19 जवान जखमी झाल्याची माहिती आहे. सी-60 फोर्स हे महाराष्ट्र पोलिसांचं नक्षलवादविरोधी विशेष दल आहे. सुकमा नक्षलवादी हल्ल्याच्या आठवणी अद्यापही ताज्या असताना नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांना लक्ष्य करत हल्ला केला आहे.
याआधी बुधवारी सकाळी भामरागड उपविभागातील कोपर्शी व पुलनार जंगल परिसरात विशेष अभियान पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षल्यांसमवेत उडालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान व दोन पोलीस किरकोळ जखमी झाले होते.त्यामध्ये टी.गुनिया(सीआरपीएफ), गिरीधर तुलावी व विजयसिंह ठाकूर यांचा समावेश होता.  सीआरपीएफ ३७ बटालियनचे टी. गुनिया आणि पोलीस दलाचे गिरीधर तुलावी व विजयसिंग ठाकूर अशी जखमींची नावे आहेत. नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या पथकावर मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नक्षल्यांनी गोळीबार सुरू केला. तेव्हा पोलिसांनी देखील प्रत्युत्तरादाखल नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी आपल्याजवळील हत्यारे व साहित्य तेथेच टाकून जंगलाचा फायदा घेत पळून गेले. जखमी तिन्ही जवानांना छत्तीसगड राज्याच्या रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील सीमावर्तीभागातही चोख बंदोबस्त पोलीसांचा ठेवण्यात आला असून पथक गस्त घालत आहेत.