नक्षलवाद्यांना पैसे पुरवणा-या तेंदुपत्ता कंत्राटदारासह तिघांना अटक

0
6

सुचित जम्बोजवार

आलापल्ली,दि.२३: नक्षल्यांना ७५ लाख रुपये नेऊन देण्याच्या तयारीत असताना काल(ता.२२)मध्यरात्री पोलिसांनी आलापल्ली येथून तीन तेंदू कंत्राटदारांना चारचाकी वाहनातून नक्षल पत्रकासह अटक केली आहे. पहाडिया तुळशीराम तांपला(३५), रवी मलय्या तनकम(४५), नागराज समय्या पुट्टा(३७) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातील विशेष अभियान पथकाचे पोलिस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे हे आपल्या सहकाऱ्यांसह नक्षलविरोधी अभियान राबवून परत येत असताना रात्री दीड वाजताच्या सुमारास त्यांना आलापल्ली येथे एक विनाक्रमांकाचे नवेकोरे चारचाकी वाहन संशयितरित्या आढळले. पोलिसांनी या वाहनातील व्यक्तींची चौकशी केली असता ते गोंधळून गेले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांनी अहेरी पोलिस ठाण्यातून अतिरिक्त पथक मागवून तिन्ही व्यक्तींची चौकशी व वाहनाची तपासणी केली असता त्यात ७५ लाख रुपये रोख व नक्षलपत्रके आढळून आली, त्यामुळे वाहनातील पहाडिया तुळशीराम तांपला, रवी मलय्या तनकम व नागराज समय्या पुट्टा या तिघांना अटक केली, असा दावा पोलिसांनी केला आहे.

तिघांची अधिक चौकशी केली असता ते तेंदूपत्ता कंत्राटदार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्याकडून जप्त केलेल्या नक्षलपत्रकाबाबत विचारणा केली असता, आपणाकडील ७५ लाख रुपये आपण नक्षल्यांना नेऊन देणार होतो, अशी कबुली तिघांनी दिल्याची माहिती पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध अहेरी पोलिस ठाण्यात यूएपीए कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आज अहेरी न्यायालयाने त्यांना २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

नक्षल्यांना रोख रक्कम व अन्य साहित्य पुरविण्याच्या आरोपाखाली तेंदूपत्ता कंत्राटदारांना अटक करण्याची गेल्या चार वर्षातील गडचिरोली पोलिसांची ही दुसरी मोठी कारवाई आहे. २१ जून २०१३ रोजी नक्षल्यांना स्फोटके पुरविण्याच्या आरोपाखाली भामरागड पोलिसांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बंडोपंत मल्लेवार यांच्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल करुन अटक केली होती. काही काळ तुरुंगात घालविल्यानंतर आता हे सहाही जण जामीनावर आहेत.