मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोसळले; मोठी दुर्घटना टळली,

0
10

लातुर,दि.२५ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर अाज (गुरुवारी) उड्डाण घेत असतानाच कोसळले. उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच हेलिकॉप्टर पॅडच्या शेजारी असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरजवळ आदळले. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत.हेलिकॉप्टर फार उंचीवर नव्हते म्हणून मोठी दुर्घटना टळली. मुख्यमंत्र्यासोबत प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, स्वीय सहायक अभिमन्यू पवार, केतन पाठक हेलीकॉप्टरमध्ये होते. दुर्घटनेत केतन पाठक किरकोळ जखमी झाले आहेत.

”मी आणि माझी टीम संपूर्णतः सुरक्षित आहे. कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही”, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.”माझ्या पाठिशी महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद. काही काळजीचं कारण नाही, मी सुखरुप आहे”, अशी प्रतिक्रियादेखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान, हेलिकॉप्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं बाहेर काढण्यात आले. यानंतर त्यांना लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घरी नेण्यात आले.
मिळालेली माहिती अशी की, निलंगा तालुक्यात ‘शेतकरी शिवार संवाद अभियान’ आटोपून मुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉप्टरने मुंबईकडे निघाले होते. याच वेळी ही दुर्घटना घडली. निलंग्यात हेलिपॅडची व्यवस्था नव्हती. त्यामुळे एका शाळेच्या मैदानात हेलिकॉप्टरच्या उड्डाणासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. हेलिकॉप्टरने यशस्वी उड्डाणही केले. मात्र, हेलिकॉप्टर जमिनीपासून तब्बल 40 फुटांवर असताना विमानाच्या मागच्या बाजूस असलेल्या पंख्यात बिघाड झाला. परिणामी वैमानिकाचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले आणि हेलिकॉप्टर विजेच्या खांबाला धडकले. हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या पात्यांचा विजेच्या तारांना स्पर्श होताच मोठा स्पार्क झाला आणि हेलिकॉप्टर विजेच्या ट्रान्सफॉर्मरजवळ कोसळले. ट्रान्सफॉर्मरपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर मातीच्या ढिगार्‍यावर हेलिकॉप्टर कोसळले. विजेच्या तार तुटल्यानंतर वीजपुरवठा खंडीत झाल्याने पुढील मोठा अनर्थ टळल्याची माहिती मिळाली आहे. हेलिकॉप्टर मातीच्या ढिगार्‍यावर कोसळल्याने आत बसलेल्या लोकांना फारशी दुखापत झाली नाही.
डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशननुसार (डीजीसीए) “हेलिकॉप्टर VT-CMM ने निलंगा येथून दुपारी 12 वाजता उड्डाण घेतले. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्याससह 6 जण होते. त्यात 2 क्रू मेंबर्सचा समावेश होता. उड्डाण घेतल्यानंतर अचानक विंड पॅटर्नमध्ये बदल झाला. त्यांनतर वैमा‍निक हेलिकॉप्टर इमरजन्सी लँडिग करत असताना ते विजेच्या खांबाला धडकून जमिनीवर कोसळले. हेलिकॉप्टरमधील सर्व जण सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले आहे.सुरक्षारक्षकांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तातडीने बाहेर काढले. मुख्यमंत्री सुखरुप असून ते कामगार मंञी संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरी विश्रांती घेत आहेत.

हेलिकॉप्टरमध्ये झाला होता बिघाड… तरीही घेतले उड्डाण!
हेलिकॉप्टरमध्ये बिघाड असल्याचे वैमानिक कर्वे यांनी पाच दिवसांपूर्वीच सांगितले होते. तरीही त्यांना उड्डाण घ्यायला लावले, अशीही माहिती समोर आली आहे. उड्डाण घेतल्यानंतर विजेच्या तारांमध्ये अडकल्याने मुख्यमंत्र्यांचे हेलीकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचले आहेत.

गडचिरोलीमध्येही मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये झाला होता तांत्रिक बिघाड…
गडचिरोली जिल्ह्यातील चामोशीॅ तालुक्यातील कोनसरी येथे 12 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. परिणामी त्यांना कारने नागपुरला जावे लागले होते.