बाबरीप्रकरणी आडवाणी, जोशी, उमा भारती न्यायालयात हजर

0
17
नवी दिल्ली, दि. 30  – बाबरी खटला प्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह भाजपाचे अनेक वरिष्ठ नेत्यांविरोधात काही वेळात सीबीआयच्या विशेष कोर्टात आरोप निश्चित होण्याची शक्यता आहे. सर्व नेते कोर्टात हजरदेखील राहिले आहेत. कोर्टात दाखल होण्यापूर्वी आडवाणी आणि भाजपाच्या अन्य नेत्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनौमधील व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस येथे भेट घेतली. बाबरी प्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाचा भाजपा नेत्यांना दिलासा, 20 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर लालकृष्ण अडवाणींसह 12 जणांना जामीन मंजूर झाले.
तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यदेखील भाजपा नेत्यांची भेट घेण्यासाठी तेथे दाखल झाले होते.  कोर्टात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कार्यवाही सुरू होणार होती. मात्र काही कारणास्तव कामकाजात उशीर झाला. दरम्यान, कोर्ट परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संबंधितांना वगळता अन्य कुणालाही आत येण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. प्रसिद्धी माध्यमांनाही कोर्ट परिसराबाहेर वार्तांकन करण्याची परवानगी देण्यात आली आहे.