वृत्तसंस्था
मेरठ- पॅरीसमध्ये चार्ली हेब्दोच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचे समर्थन करत हा हल्ला करणा-या दहशतवाद्यांना ५१ कोटी रुपयांचे ईनाम बहुजन समाजवादी पार्टीचा नेता हाजी याकूब कुरेशी यांनी जाहीर केले. इस्लाम धर्मात हिंसेला स्थान नसले तरी, (रसूल के आशिक उन्हे सजा दे देते है) मोहम्मद पैगंबरांचा अवमान करणा-याला त्यांचे अनुयायी शिक्षा देणारच, असे वक्तव्य करुन कुरेशी यांनी नविन वादाला तोंड फोडले आहे. पैगंबरांचा अवमान करणा-यांना मारलेच पाहिजे, अशी मुक्ताफळेही कुरेशी यांनी उधळली आहेत.
या हल्ल्यातील दहशतवादी आपल्याकडे पैसे मागण्यासाठी आले तर, त्यांना ५१ कोटी रुपये बक्षीस देण्याची आपली तयारी असल्याचे हाजी यांनी सांगितले.
आठ वर्षांपूर्वी डेन्मार्कच्या कार्टुनिस्टांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर कार्टून काढले होते. त्यावेळीही कुरेशी यांनी त्या कार्टुनिस्टला ठार मारणा-याला ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. बसपात येण्याच्या आधी हाजी याकूब हे सपा आणि रालोदमधून खासदार होते. त्यांचा मेरठमध्ये एक कत्तलखाना आहे.
दरम्यान, याप्रकरणी आपल्याकडे कोणतीही माहिती आलेली नाही. मात्र कुरेशी यांचे वक्तव्य तपासून त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे उत्तर प्रदेशचे पोलीस अधिक्षक ओंकार सिंह यांनी सांगितले.