वेणा जलाशयात नाव उलटून 7 तरुण बुडाले,पाच मृतदेह सापडले

0
18

नागपूर,दि.10 – नागपूरमधील वेणा जलाशयात बोट उलटल्याने रविवारी 11 तरुण बुडाले आहेत. यातील तीन तरुणांना वाचवण्यात यश आले आहे. यात दोन नाविकांसह एक पर्यटक तरुणाचा समावेश आहे. दरम्यान, पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. राहुल जाधव, अंकीत भोस्कर, परेश कटीके, रोशन खांदारे आणि अक्षय खांदारे या पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत.
तर अतुल भोयर, पंकज डोईफोडे आणि प्रतिक आमडे हे तीन जण अजून बेपत्ता आहेत. दरम्यान, ही दुर्घटना घडण्यापूर्वी या तरुणांनी फेसबुक लाईव्ह केले होते. सहलीचा कसा आनंद घेत आहेत याची माहिती बोटीतील हे तरुण फेसबुक लाईव्हद्वारे आपल्या मित्रांना सांगत होते. यावेळी काही जणांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. शिवाय, एवढे जण एका बोटीत कसे बसले आहात, असा प्रश्न उपस्थित करत भीतीदेखील व्यक्त केली होती.
काही वेळाने ही बोट उलटून दुर्घटना घडली ज्यात 11 जण बुडाले. यातील तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. रविवारी (9 जुलै) संध्याकाळी ही दुर्घटना घडल्याने अंधारामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. त्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते.आज सकाळी पुन्हा तपास कार्य सुरु करण्यात आले.त्यानंतर चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.कळमेश्वरचे ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवा मैल वाडी तसेच आजूबाजूच्या परिसरात राहणारे अमोल मुरलीधर दोडके (28), रोशन मुरलीधर दोडके, राहुल जाधव, अंकित अरुण भोसकर (22), परेश काटोके, अतुल भोयर, पंकज डोईफोडे, प्रतीक आमडे, रोशन ज्ञानेश्वर खांदारे (23) आणि अक्षय मोहन खांदारे हे रविवारी पिकनिकसाठी धामणाजवळच्या वेणा जलाशय परिसरात गेले होते. सायंकाळी 6.30च्या सुमारास अतुल ज्ञानेश्वर बावणे (22) याच्या नावेत ते बसले. जलाशयाच्या मधे गेल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात सर्व जण एकाच बाजूला जमले. परिणामी नावेचे संतुलन बिघडले आणि नाव उलटली आणि ही दुर्घटना घडली.