क्रांतीवीर नारायण उईके जन्मशताब्दी सोहळा व आदिवासी मेळावा ११ रोजी

0
14

गोंदिया,दि.१० : मागासलेल्या आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी लढणारे क्रांतीवीर नारायणसिंह उईके यांचा २०१७ जन्मशताब्दी सोहळा तसेच आदिवासी मेळावा ११ जुलै रोजी मयुर लॉन येथे आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती, गोंडवाना व आदिवासी गोवारी समाज कटंगीकलाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आहे. या सोहळ्यात आदिवासी सेवकांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी क्रांतीवीर नारायणसिंह उईके यांनी शासनाशी लढा दिला. सन १९५० च्या पहिल्या बिलात गोवारी जमातीचे नाव नाही म्हणून १९५३ व1955 मध्ये गोवारी समाज आदिवासीच आहे, असे सिद्ध करीत केन्द्र व राज्य शासनास गोवारी नोंद घेण्यास भाग पाडले .मात्र दुर्दैवाने अनुसूचित जमाती च्या यादीत “गोंड गोवारी ” अशी संयुक्त नोंद आली . परंतु, अद्यापपर्यंत गोवारी समाजाला न्याय देण्यात आला नाही. हा लढा आजघडीला सुरू असताना क्रांतीवीर नारायणसिंह उईके यांच्या स्मरणार्थ त्यांचा २०१७ हा जन्मशताब्दी वर्ष व जयंती सोहळा निमित्ताने आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते, खा. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. गोपालदास अग्रवाल, आ. संजय पुराम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, विनोद अग्रवाल, डॉ. नामदेवराव किरसान आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमानिमित्त डॉ. विनायक तुमडाम, माणिक कौरोथी , सौ. उषाकिरण आत्राम, दशरथ मडावी, वामनराव शेडमाके, कृष्णकुमार चांदेकर, गुलाबसिंग कोडापे, दुर्गाप्रसाद कोकोडे, गोपालसिंह उईके, सुभाष न्यायमूर्ती, महाराजसिंह कोडापे व उदेलाल सोरले यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी गोवारी समाजबांधवांसह आदिवासी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गोंडवाना आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीचे निमंत्रक दामोदर नेवारे , स्वागताध्यक्ष क्रिष्णा सर्पा , स्थानिक संयोजक दिनेश कोहळे ,मार्गदर्शक गुलाबसिंग कोडापे गुरूजी तसेच आयोजकांनी केले आहे.