अमरनाथ यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, 16 जणांचा मृत्यू

0
9

श्रीनगर,दि. 16 – अमरनाथ यात्रेसाठी चाललेल्या भाविकांची बस काश्मीरमध्ये दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 16 भाविकांचा मृत्यू झाला तर 35 भाविक जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार जम्मूमधील रामबन जिल्ह्यातील बनिहालजवळ जम्मू-श्रीनगर महामार्गावर आज दुपारी हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळावर मदत आणि बचाव काम सुरू करण्यात आले आहे.
अपघातातील 19 गंभीर जखमींना उपचारांसाठी हवाई मार्गाने रुग्णालयात पोहोचवण्यात आले आहे. तर 8 जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. अमरनाथ यात्रेकरूंवर कोसळलेली ही आठवडाभरातील दुसरी आपत्ती आहे. याआधी गेल्या सोमवारी दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ७ भाविक मरण पावले होते. तर तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले होते.