‘एटीएम’द्वारे १५ लाखांपर्यंत कर्ज!

0
7

नवी दिल्ली,(वृत्तसंस्था)- खासगी क्षेत्रातील आघाडीच्या आयसीआयसीआय बँकेतर्फे खास नोकरदारांसाठी एटीएमच्या माध्यमातून पंधरा लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या नोकरदारांनी बँकेकडून आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नाही, त्यांच्यासाठीच ही सुविधा असल्याचे आयसीआयसीआय बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
संभाव्य ग्राहकांनी यापूर्वी कर्ज घेतले आहे अथवा नाही, याची पडताळणी क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांच्या मदतीने करण्यात येणार आहे. त्यानंतरच संबंधिताला एटीएमच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन)उपलब्ध करून दिले जाणार आहे. योजनेसाठी नोकरदाराची निवड झाल्यानंतर संबंधिताला पंधरा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पाच वर्षांच्या मुदतीसाठी देण्यात येईल. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर लगेचच कर्जाची रक्कम संबंधिताच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. गुरुवारपासूनच ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे, असेही बँकेने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. पंधरा लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची निवड ग्राहकाने केल्यानंतर संबंधिताला व्याजाचा दर, प्रक्रिया शुल्क (प्रोसेसिंग फी) आणि दर महा कापून घेण्यात येणारी रक्कम या विषयीची माहिती बँकेतर्फे देण्यात येईल.
‘या योजनेमुळे अडचणीच्या काळात ग्राहकांना सहज कर्ज उपलब्ध होणार आहे. शिवाय कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही ऑनलाइन केली जाणार आहे. त्यामुळे अतिशय अल्प कालावधीत एटीएमच्या माध्यमातून कर्जाची रक्कम संबंधिताकडे सुपूर्द केली जाईल,’ अशी माहिती आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची यांनी दिली.